दसऱ्याच्या सकाळीच असीम सरोदे यांचं ट्विट: शिंदेंचा हा शेवटचा मेळावा ठरू शकतो
ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी ट्विट करून एकनाथ शिंदे यांचा हा कदाचित शेवटचा दसरा मेळावा असेल, असं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात आज एकूण पाच दसरा मेळावे होत आहेत. त्यापैकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा पार पडला आहे, तर चार मेळावे अजून बाकी आहेत. पंकजा मुंडे, मनोज जरांगे पाटील, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मेळावे होणार आहेत.
या चारपैकी ठाकरे आणि शिंदे यांच्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ठाकरेंची गर्जना काय असेल आणि शिंदेंची डरकाळी काय असेल, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. अशातच ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांचा हा कदाचित शेवटचाच दसरा मेळावा असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सरोदे यांनी सकाळी सकाळीच ट्विट करून दसऱ्याच्या दिवशीच शिंदे गटाला टेन्शन दिलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, पक्षाचं नाव चोरून मिळवलेली ओळख घेऊन सत्तानाथ यांचा हा शेवटचा दसरा मेळावा ठरला, तर आश्चर्य वाटायला नको! आधी पक्षचोरी, मग निवडणुकीतल्या कथित गैरप्रकारांचे प्रयोग आणि आता सत्तेच्या नाटकाचा अखेरचा अंक! लोकशाहीच्या रंगमंचावर सगळे प्रयोग यशस्वी झाले असं वाटत असलं, तरी न्यायालयाचा पडदा सत्तेचा खेळ संपवेल, हे अजून बाकी आहे! कारण सत्ता कितीही मोठी असली, तरी लोकशाहीत अंतिम शब्द सत्तेचा नसतो, तो संविधानाचा आणि न्यायाचा असतो!
या ट्विटमुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. सरोदे यांचं हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षावर सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी या महिन्याच्या अखेरीस संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना ठाकरेंची होणार की शिंदेंची, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत शिवसेना ठाकरेंचीच कशी आहे, हे मांडलं आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनीही न्यायालयात आक्रमकपणे शिंदे गटाची बाजू मांडली. शिवसेना शिंदे गटाचीच आहे, असं त्यांनी कोर्टासमोर सांगितलं. दोन्ही गटांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना विविध खटल्यांचा दाखलाही दिला आहे.
आता कोर्ट त्यावर काय निर्णय देणार, हे पाहावं लागणार आहे. हा निकाल केवळ एक निकाल राहणार नसून तो ऐतिहासिक निकाल असणार आहे. भविष्यात राजकीय पक्षांचे वाद सोडवताना हा निकाल महत्त्वाचा आधार ठरेल. म्हणूनच देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.