सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 321 | Very Poor 08:35 IST

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: मुळशीत कट रचल्याचा संशय, विशेष तपास पथकाच्या हाती मोठे धागेदोरे

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: मुळशीत कट रचल्याचा संशय, विशेष तपास पथकाच्या हाती मोठे धागेदोरे छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात मुख्य आरोपी पप्या शिंदे आणि आणखी चार जणांचा समावेश आहे. पप्या शिंदे आणि निखील यादव यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी गंभीर आरोप केला आहे. ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या नगरसेविका मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनीच कट रचून प्रदीप पूर्णेकर यांची हत्या केली, असा त्यांचा आरोप आहे. या आरोपांनंतर पोलिसांनी राजेंद्र शिंदे यांना सात वेळा चौकशीसाठी बोलावल्याची माहिती आहे.

या सगळ्या घडामोडींनंतर राम पूर्णेकर यांनी मिनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्याशी संबंधित दोन व्हिडिओ जारी केले आणि एकच खळबळ उडाली. त्यांनी जारी केलेल्या एका व्हिडिओत आरोपी निखील यादव बंदूक चालवताना दिसतो. त्याच्या बाजूला राजेंद्र शिंदे हेदेखील उभे असल्याचे त्यात दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ मुळशीतला असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ विशेष तपास पथकाच्या हाती लागला आहे. त्यानंतर पोलिसांनी मुळशीत जाऊन या व्हिडिओबाबत चौकशी केली आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील हा मोठा दुवा असल्याची चर्चा आहे.

या प्रकरणात पोलिसांनी राजेंद्र शिंदे यांची शुक्रवारी सातव्यांदा चौकशी केली. त्यानंतर सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आले.

चौकशीतून आणखी एक गोष्ट समोर आली आहे. आरोपींनी पूर्णेकर यांच्या हत्येसाठी मुंबईतील चोर बाजारातून २०० ते ३०० रुपयांना हत्यारे खरेदी केली होती. ही हत्यारे अद्याप जप्त करण्यात आलेली नाहीत.

याशिवाय, या प्रकरणातील आरोपी संतोष कनोजिया आणि अमित सिंग या दोघांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस या हत्या प्रकरणात अधिक खोलात जाऊन चौकशी करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ आणि आरोपींची चौकशी यातून पुढे काय समोर येते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ