सोमवार, 2 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा दणका; वायसीएमचे अधिष्ठाता आणि उद्यान अधीक्षकांना नोटीस, दोन दिवसांत खुलासा

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा दणका; वायसीएमचे अधिष्ठाता आणि उद्यान अधीक्षकांना नोटीस, दोन दिवसांत खुलासा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी डॉ. राजेंद्र वाबळे आणि महेश गारगोटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, दोन दिवसांत लेखी खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनास्थेविरोधात महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सात महिन्यांत त्यांनी तब्बल ११ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याचा धडाका सुरू झाला आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आणि महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे या दोघांना आयुक्तांनी "कारणे दाखवा" नोटीस बजावली आहे. दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करा, असे आदेश आयुक्तांनी या दोघांना दिले आहेत. म्हणजेच दोघांनाही आपली बाजू लेखी स्वरूपात मांडावी लागणार आहे.

आधी डॉ. वाबळे यांच्याबाबतची नोटीस. वायसीएम रुग्णालयातील एका सहायक प्राध्यापकाचा अपमान केल्याप्रकरणी डॉ. वाबळे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपांचे गांभीर्य, सुरू असलेला पोलीस तपास आणि शासकीय कर्मचाऱ्याला शोभणार नाही असे गैरवर्तन करून कर्तव्यात सचोटी न बाळगणे, असा ठपका ठेवत त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे. दोन दिवसांत दिलेला खुलासा असमाधानकारक आढळला किंवा खुलासा सादरच केला नाही, तर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

दुसरे प्रकरण मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांच्याशी संबंधित आहे. पिंपरीतील एका खाजगी जागेतील हेरिटेज दर्जा असलेली ५२ पुरातन झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. झाडांची संख्या आणि त्यांचे वय कागदोपत्री कमी दाखवून फेरफार केल्याचा ठपकाही त्यांच्यावर आहे. प्रचलित नियम, शासनाचे निर्देश आणि प्रशासकीय मंजुरी डावलून वृक्षतोडीला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या गैरकारभारामुळे महापालिकेचे आर्थिक आणि महसुली नुकसान झाल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे. शहरातील झाडांचे संरक्षण, संगोपन आणि उद्यानांची देखभाल करण्याची जबाबदारी असतानाही त्यांनी कर्तव्यात कसूर केला, असे नोटिशीत म्हटले आहे. त्यामुळे "आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये?" अशी विचारणा नोटिशीद्वारे गारगोटे यांना करण्यात आली आहे.

ठरलेल्या मुदतीत समाधानकारक खुलासा सादर झाला नाही, तर दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे महापालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

#पुणे#शहर#PT24#Civic#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ