लंडनला गेलेल्या मुग्धा देशमुख यांचा गहुंजेतील बंद फ्लॅटमध्ये कुजलेला मृतदेह सापडला
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्रेडिट कार्डच्या वापरावरून पोलिसांनी माग काढला आणि बंद फ्लॅटमध्ये ३४ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला.
पिंपरी-चिंचवडजवळच्या गहुंजे येथील 'लोढा बेलमोंडो' या आलिशान सोसायटीतील एका बंद फ्लॅटमध्ये ३४ वर्षीय तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुग्धा अविनाश देशमुख असे त्यांचे नाव असून त्या छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी होत्या. त्या उच्चशिक्षणासाठी लंडनला गेल्या होत्या. म्हणजेच लंडनमध्ये आहेत असे घरच्यांना वाटत असताना त्यांचा मृतदेह भारतात सापडला.
मुग्धा या छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे निवृत्त मुख्य अभियंता अविनाश देशमुख यांच्या कन्या आहेत. जुलै २०२५ मध्ये त्या एमबीएच्या शिक्षणासाठी लंडनला गेल्या होत्या. लंडनमध्ये असताना त्या रोज घरच्यांशी बोलत असत. मात्र २३ ऑक्टोबर २०२६ रोजी आईशी शेवटचे बोलणे झाले आणि त्यानंतर त्यांचा संपर्क अचानक तुटला.
संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी लंडनमधल्या त्यांच्या मैत्रिणीकडे चौकशी केली. तेव्हा मुग्धा यांनी ऑगस्ट २०२६ च्या शेवटीच लंडन सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. भारतात परतल्यानंतरही त्यांनी कुटुंबाला याबद्दल काहीच सांगितले नव्हते. भारतीय उच्चायुक्तांकडून काही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून चिंतेत असलेल्या आई-वडिलांनी उस्मानपुरा (छत्रपती संभाजीनगर) पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
तपासात पोलिसांनी मुग्धा यांच्या बँक खात्यांचे व्यवहार आणि डिजिटल फुटप्रिंट्स तपासले. त्यात भारतातील झोमॅटो, ब्लिंकिट आणि स्विगी यांसारख्या ऑनलाइन फूड ॲप्सवर त्यांचे क्रेडिट कार्ड वापरले जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून त्या लंडनमध्ये नसून भारतातच आहेत, हे नक्की झाले.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांचे पथक गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीत पोहोचले. तिथल्या फ्लॅटचे दार बंद होते, म्हणून पोलिसांनी बनावट चावीने ते उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी बेडरूममध्ये मुग्धा यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.
शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे. मुग्धा ऑगस्ट २०२६ पासून गहुंजे येथील या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. त्यांच्याकडे कामाला असलेल्या मोलकरणीलाही त्यांनी २१ ऑक्टोबर रोजी काम बंद करायला सांगितले होते.
मृतदेहाचे शवविच्छेदन झाले असून व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल आणि मोबाईलचे फॉरेन्सिक विश्लेषण हाती आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.