लंडनहून परतलेल्या मुग्धा देशमुखचा गहुंजे येथील बंद फ्लॅटमध्ये कुजलेला मृतदेह सापडला
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
एमबीएसाठी लंडनला गेलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या ३४ वर्षांच्या मुग्धा देशमुखचा मृतदेह लोढा बेलमोंडो सोसायटीतील फ्लॅटमध्ये सापडला. मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवाल आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणानंतरच कळेल, असे पोलिसांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवडजवळच्या गहुंजे येथील लोढा बेलमोंडो या आलिशान सोसायटीत एका बंद फ्लॅटमध्ये ३४ वर्षांच्या मुग्धा अविनाश देशमुख हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आणि परिसरात खळबळ उडाली. मुग्धा मूळची छत्रपती संभाजीनगरची. एमबीएच्या शिक्षणासाठी ती जुलै २०२५ मध्ये लंडनला गेली होती.
लंडनमध्ये असताना ती रोज घरच्यांशी बोलायची. २३ ऑक्टोबरच्या रात्रीही तिचे आईशी नेहमीप्रमाणे बोलणे झाले. "मी थोडी घाईत आहे, मला जॉब इंटरव्ह्यू द्यायचा आहे, त्यामुळे आत्ता फोन ठेवते," असे सांगून तिने फोन कट केला. आईशी झालेले हे तिचे शेवटचे बोलणे ठरले.
दुसऱ्या दिवशी मुग्धाने आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक आणि मित्र यांपैकी कोणाचाच फोन उचलला नाही. काही वेळाने तिचा फोन स्विच ऑफ झाला. ती कुठे असेल, फोन का उचलत नाही, नेमके काय झाले असेल, असे प्रश्न आई-वडिलांना आणि कुटुंबीयांना पडले. त्यांनी लंडनमधील तिच्या एका मैत्रिणीमार्फत चौकशी केली, तेव्हा मुग्धाने ऑगस्टच्या शेवटीच लंडन सोडल्याचे समोर आले.
भारतीय उच्चायुक्तांकडून प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून पालकांनी मुग्धाच्या बँक खात्यांचे व्यवहार तपासले. त्यात झोमॅटो, ब्लिंकिट आणि स्विगी या ॲप्सवर भारतात तिचे क्रेडिट कार्ड वापरले गेल्याचे दिसले. ती भारतातच असल्याची खात्री झाल्यावर आई-वडिलांनी २७ ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गेले आणि मुग्धाच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. घडलेला सगळा क्रम आणि बँक खात्यांची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास केला आणि मुग्धाचे लोकेशन गहुंजे येथील लोढा सोसायटीत असल्याचे दिसले. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आई-वडिलांना घेऊन पुण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिरगाव पोलिसांना कळवण्यात आले आणि रात्री अकराच्या सुमारास सर्वजण सोसायटीत पोहोचले. फ्लॅट आतून लॉक होता. डुप्लिकेट चावीसाठी की-मेकरला बोलावले गेले. त्याने चावी बनवून दार उघडले, तेव्हा आत शिरताच दुर्गंधी आली. पुढे जाऊन पाहिले तर बेडवर एका कुशीवर मुग्धाचा कुजलेला मृतदेह पडलेला होता.
मुग्धाने हा फ्लॅट एप्रिल २०२६ मध्ये भाड्याने घेतला होता. त्याचे ॲग्रिमेंटही फ्लॅटमालकाकडून पोलिसांना मिळाले. ती तिथे एकटीच राहायची. सुरक्षा रक्षक आणि शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता तिच्याकडे कोणी येत असल्याचे आढळले नाही. तिच्या फोन हिस्ट्रीतूनही ती फार कोणाच्या संपर्कात असल्याचे दिसले नाही. घराच्या झडतीत संशयास्पद काहीही सापडले नाही. शवविच्छेदन अहवालात शरीरावर कोणत्याही इजा दिसल्या नाहीत, मात्र खबरदारी म्हणून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुग्धाचा मृत्यू अटॅकमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. शिरगाव पोलीस सर्व शक्यता गृहीत धरून पुढील तपास करत आहेत. या घटनेने देशमुख कुटुंबीय हादरून गेले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.