सोमवार, 2 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट सर्व थेट अपडेट

पिंपरी-चिंचवडमध्ये १८ व्या मजल्यावरून उडी घेऊन आई आणि सहा वर्षांच्या मुलाने संपवले जीवन; आठ पानांची चिठ्ठी

पिंपरी-चिंचवडमध्ये १८ व्या मजल्यावरून उडी घेऊन आई आणि सहा वर्षांच्या मुलाने संपवले जीवन; आठ पानांची चिठ्ठी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

डांगे चौकाजवळील सिग्नेचर पार्क सोसायटीत शुक्रवारी सायंकाळी घटना; वाकड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद.

पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरात शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. डांगे चौकाजवळील सिग्नेचर पार्क या उच्चभ्रू सोसायटीतील इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी घेऊन ३३ वर्षांची महिला आणि तिचा सहा वर्षांचा मुलगा यांनी जीवन संपवले. या दोघांचा मृत्यू झाला आहे. मणक्याच्या आजाराला कंटाळून महिलेने मुलासह आत्महत्या केली, असे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी पोहोचले. आई आणि मुलगा हे दोघेही १८ व्या मजल्यावरून खाली पडल्याचे दिसून आले. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. वाकड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला गृहिणी होती. तिचे पती मनोज येरवडा येथील एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करतात. हे कुटुंब मूळचे राजस्थानचे असून गेली दोन वर्षे याच सोसायटीत राहत होते.

पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात ही महिला मुलाला सोबत घेऊन लिफ्टने १८ व्या मजल्यावर जाताना दिसली. त्या मजल्यावरील गॅलरीजवळ दोघांच्याही चपला सापडल्या. त्यामुळे महिलेने मुलासह स्वतः उडी मारल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

पोलिसांना महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सात ते आठ पानांची चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीत तिने पतीबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. आपल्या मृत्यूनंतर त्यांनी पुन्हा लग्न करावे आणि आयुष्य नव्याने उभे करावे, अशी इच्छा तिने लिहिली आहे, असे सांगितले जाते.

मुलाच्या भविष्याबद्दल आणि आपल्या नसण्याशी तो कसा जुळवून घेईल, याबद्दलची चिंताही तिने चिठ्ठीत मांडली आहे. आपल्या मृत्यूनंतर मुलगा वारंवार आईबद्दल विचारत राहील, या भीतीने मुलालाही सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्या चिठ्ठीत नमूद असल्याचे समजते. लहान मूल सोबत असेल तर पतीला दुसरे लग्न करताना अडचण येऊ शकते, अशी भीतीही तिने व्यक्त केली होती.

अनेक वर्षांपासून ही महिला मणक्याच्या आजाराने त्रस्त होती. अनेक रुग्णालयांत उपचार करूनही आजाराचे निदान होत नव्हते, याच त्रासाचा उल्लेख तिने चिठ्ठीत केला आहे. पोलीस चिठ्ठीतील मजकुराची छाननी करत आहेत.

एका आईने सहा वर्षांच्या चिमुरड्यासह जीवन संपवल्याने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

#पुणे#जुर्म#PT24#Crime#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ