डांगे चौकातील सिग्नेचर पार्कमध्ये १८ व्या मजल्यावरून आई आणि सहा वर्षांच्या लेकाचा मृत्यू
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
डांगे चौकातील सिग्नेचर पार्क सोसायटीत शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या घटनेत एकता भांगड आणि त्यांच्या सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या मुलासोबत लिफ्टने १८ व्या मजल्यावर जाताना दिसल्या, असे पोलिसांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवडमधल्या वाकड भागात, डांगे चौकाजवळच्या सिग्नेचर पार्क सोसायटीत शुक्रवारी (३० ऑक्टोबर) संध्याकाळी एक मन सुन्न करणारी घटना घडली. एका महिलेचा आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाचा १८ व्या मजल्यावरून खाली कोसळून मृत्यू झाला. संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान हे घडलं.
मरण पावलेल्या महिलेचं नाव एकता मनोज भांगड असं असून त्या ३३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मुलाचं नाव माधव. भांगड कुटुंब मूळचं राजस्थानचं आहे. गेली दोन वर्षं ते याच सोसायटीत राहत होते. घरात नवरा, बायको आणि मुलगा असे तिघंच होते. एकता यांचे पती मनोज येरवड्यातल्या आयटी पार्कमधल्या एका कंपनीत नोकरी करतात. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ते नेहमीसारखे कामावर गेले, तेव्हा घरी एकता आणि माधव होते.
इमारतीच्या आतल्या डक्टमधून अचानक मोठा आवाज आला, म्हणून रहिवासी धावत खाली गेले. तिथे आई आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. लोकांनी लगेच वाकड पोलिसांना कळवलं आणि पोलीस स्टेशनचं पथक तातडीने तिथे पोहोचलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिग्नेचर पार्कच्या बिल्डिंगमधून दोन बॉडी पडल्याचा निरोप साडेसहाच्या सुमारास त्यांना मिळाला होता.
पोलिसांनी इमारतीतले सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात एकता मुलाला घेऊन लिफ्टने १८ व्या मजल्यावर जाताना दिसतात. त्या मजल्यावरच्या गॅलरीजवळ दोघांच्याही चपला सापडल्या. त्यामुळे एकता यांनी मुलासह स्वतः उडी मारली असावी, असं पहिल्या नजरेत दिसतंय. फॉरेन्सिक व्हॅन बोलावून त्या पथकाच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे.
पोलिसांना घटनास्थळी तीन पानी चिठ्ठी मिळाल्याचंही सांगितलं जातंय. आजारपणाला कंटाळून आपण आयुष्य संपवतोय, आपल्यानंतर मुलाला आपली आठवण येईल, म्हणून त्यालाही सोबत नेतोय, असा मजकूर त्यात असल्याचं बोललं जातं. मात्र पोलिसांनी याला अजून दुजोरा दिलेला नाही. वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी सांगितलं की, मृत्यूमागचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. आत्ता एवढीच प्राथमिक माहिती हातात आहे, पुढच्या चौकशीत काही नवं समोर आलं तर ते कळवू, असं पोलिसांनी म्हटलं आहे. वाकड पोलीस पुढचा तपास करत आहेत.
या घटनेनं सोसायटीतले रहिवासी आणि आजूबाजूचे लोक हादरले आहेत. सगळीकडे हळहळ व्यक्त होतेय.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी तीन ठिकाणी वाघाने हल्ले केले. त्यात दोघांचा जीव गेला आणि एक जण गंभीर जखमी झाला. चिमूर तालुक्यातल्या गरडापार इथले ५५ वर्षांचे सदाशिव खडसंग यांच्यावर वाघाने हल्ला केला आणि त्यात ते मरण पावले. सिंदेवाही तालुक्यातल्या धुमनखेडा इथे शेतात काम करत असलेले ७० वर्षांचे शेतकरी पत्रुजी मेश्राम यांचाही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. पोंभुर्णा तालुक्यातल्या सातारा तुकूम परिसरात गुरं चरायला जंगलात गेलेले ६० वर्षांचे राजेश्वर सिडाम गंभीर जखमी झाले असून चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात आधीच तिघांचा बळी गेला होता. त्यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीती पसरली असून वाघाचा तातडीने बंदोबस्त करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.