पिंपरी-चिंचवडमध्ये १८ व्या मजल्यावरून उडी मारून आई आणि सहा वर्षांच्या मुलाने संपवले आयुष्य
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
डांगे चौकाजवळील सिग्नेचर पार्क सोसायटीत शुक्रवारी सायंकाळी घटना घडली. वाकड पोलिसांना महिलेची चिठ्ठी सापडली असून पुढील तपास सुरू आहे.
पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डांगे चौकाजवळील सिग्नेचर पार्क सोसायटीच्या इमारतीत १८ व्या मजल्यावरून उडी मारून एका आईने आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाने आयुष्य संपवले. शुक्रवारी, ३० तारखेला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
मृत महिला ३३ वर्षांची होती आणि ती गृहिणी होती. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे पती येरवडा येथील एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करतात. हे कुटुंब मूळचे राजस्थानचे असून गेल्या दोन वर्षांपासून याच सोसायटीत राहत होते.
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आई आणि मुलगा दोघेही १८ व्या मजल्यावरून खाली पडल्याचे तिथे समोर आले. सध्या फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. दोघांनी इमारतीवरून उडी मारून जीवन संपवल्याचे तपासात आढळून आले आहे.
पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यात ही महिला मुलाला सोबत घेऊन लिफ्टने इमारतीच्या १८ व्या मजल्यावर जाताना दिसली. त्या मजल्यावरील गॅलरीजवळ दोघांच्याही चपला सापडल्या आहेत. त्यामुळे महिलेने मुलासह स्वतः उडी मारून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
महिलेने जीव देण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. त्यातील मजकुरानुसार तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या मृत्यूनंतर पतीने पुन्हा लग्न करावे आणि आपले आयुष्य नव्याने उभे करावे, असे तिने लिहिले आहे. मुलाच्या भविष्याची आणि आपण नसल्यावर तो कसा जुळवून घेईल याची चिंताही तिने चिठ्ठीत मांडली आहे.
आपल्या मृत्यूनंतर मुलगा वारंवार आईबद्दल विचारत राहील, या भीतीने तिने त्यालाही सोबत नेण्याचा निर्णय घेतल्याचे चिठ्ठीत नमूद असल्याचे समजते. लहान मूल सोबत असले तर पतीला दुसरे लग्न करण्यात अडचण येऊ शकते, अशी भीतीही तिने व्यक्त केली होती. पोलीस या चिठ्ठीतील मजकुराची छाननी करत आहेत.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी या घटनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "सुसाईड नोटमध्ये महिलेने आपल्या आजारपणाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. तसेच, आपल्या पश्चात मुलाला आपली आठवण येईल, म्हणून त्यालाही सोबत नेत असल्याचे तिने त्यात नमूद केले आहे." या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.