सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 244 | Poor 10:45 IST

कोरेगाव पार्कमध्ये २५ ऑक्टोबरला आठवणींवर कवितांची मैफल, कवितaKAFE चा "भूले-बिसरे"

आठवणी या विषयावर आधारित कविता ओपन माइकचे आयोजन कोरेगाव पार्क येथील मोनालिसा कलाग्राममध्ये करण्यात आले आहे.

कोरेगाव पार्क, २२ ऑक्टोबर २०२६: काही आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत. एखादे ओळखीचे गाणे, जुना फोटो, विसरलेला संवाद किंवा कवितेच्या काही ओळी ऐकल्या की त्या आपल्याच गोष्टीसारख्या वाटू लागतात. अशा आठवणींचा उत्सव साजरा करण्यासाठी KavitaKAFE "Bhoole-Bisre" हा आठवणींवर आधारित कविता ओपन माइक घेऊन येत आहे. हा कार्यक्रम २५ ऑक्टोबरला दुपारी ४:३० ते सायंकाळी ६:३० या वेळेत पुण्यातील कोरेगाव पार्क येथील मोनालिसा कलाग्राममध्ये होणार आहे.

या कार्यक्रमात कवी, संगीत आणि सर्वांचे अनुभव एकत्र येतील. एकेका कडव्यातून भूतकाळात डोकावता येईल, अशी जागा यातून तयार होणार आहे. जपलेले क्षण, अर्धवट राहिलेले संवाद, तसेच काळाने दूर नेलेली माणसे आणि ठिकाणे, या सगळ्या आठवणींना कवितेतच सर्वात प्रामाणिक शब्द सापडतात.

KavitaKAFE च्या संस्थापक गरिमा मिश्रा यांच्या मते, प्रत्येक कार्यक्रमाला वेगळी ओळख देणे हा अनुभवाचा महत्त्वाचा भाग आहे. त्या म्हणतात, "सुरुवातीपासूनच आम्ही आमच्या कार्यक्रमांना केवळ 'ओपन माइक' न म्हणता काही ना काही नाव देत आलो आहोत. ठरलेल्या विषयावरच सादरीकरण करणे सहभागींना बंधनकारक नसते, पण त्यामुळे त्यांना चौकटीबाहेर विचार करता येतो आणि आधी लिहिलेले सादर करण्याऐवजी काहीतरी नवे लिहिता येते."

या पद्धतीमुळे KavitaKAFE चे कार्यक्रम फक्त काव्यवाचनाचे व्यासपीठ राहिले नाहीत. प्रत्येक विषय एक सर्जनशील कल्पना देतो. त्यातून सहभागी ओळखीच्या भावनांकडे नव्या नजरेने पाहतात आणि प्रत्येकाला स्वतःची अभिव्यक्ती मांडायला जागाही मिळते.

भूले-बिसरेमध्ये कवितेला संगीताची जोड असेल. सुफी गायक ओंकार झांजोटे आपल्या वेगळ्या शैलीतील सादरीकरण करतील, तर अनुपम बॅनर्जी जुन्या बॉलिवूड गाण्यांचा गोडवा पुन्हा उलगडतील. कविता आणि संगीत एकत्र आल्यावर क्षण निघून गेल्यानंतरही आपल्यासोबत राहणाऱ्या सुरांच्या आणि शब्दांच्या आठवणी जाग्या होतील, असा आयोजकांचा विश्वास आहे.

ओंकार म्हणतात, "मी अनेक ठिकाणी सादरीकरण केले आहे, पण KavitaKAFE मध्ये संगीताची जी समज आणि दाद मिळते, तिला तोड नाही. KavitaKAFE सोबतचे नाते मला मोलाचे वाटते."

असाच अनुभव इतर कलाकारही सांगतात. चिन्मयी कात्रे जून २०२६ पासून KavitaKAFE शी जोडलेल्या आहेत. त्यांच्या मते हे एक कुटुंब आहे, जिथे परस्परांचा आदर, प्रामाणिकपणा आणि विश्वास यामुळे प्रत्येक कवीला आपलेसे वाटते. गरिमा यांचा जिव्हाळा, प्रत्येक कार्यक्रमामागची व्यावसायिकता आणि प्रत्येक कलाकाराची दखल घेऊन होणारे कौतुक यामुळे लोक आनंदी, समाधानी आणि या कुटुंबाचा भाग असल्याचा अभिमान बाळगणारे होतात, असे त्या सांगतात.

उपस्थित निशा विकास यांचेही मत असेच आहे. त्या म्हणतात, "KavitaKAFE सोबत आमचे नाते तसे नवे आहे, तरीही आम्हाला अतिशय आपुलकीचा अनुभव आला आणि प्रत्येक कार्यक्रमात शिस्तबद्ध पद्धत दिसली. या सुंदर कुटुंबाचा कायमचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे."

KavitaKAFE ची सुरुवात २०२४ मध्ये झाली. तेव्हापासून कवितेच्या मैफलींपलीकडे जाऊन साहित्यिक चर्चा आणि अलीकडे जुलैमध्ये सुरू झालेला Authors' Adda हा साहित्यिक उपक्रम असा त्याचा विस्तार झाला आहे. या व्यासपीठावर आतापर्यंत दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. पत्रकार आणि लेखिका सुनंदा मेहता व सुचित्रा अय्यर यांचे Behind the Big Screen: The Untold Stories of Child Actors आणि दिनेश राहेजा यांचे Adhoori Khwahishon Ne: Unfulfilled Desires.

जवळपास दोन वर्षांपासून KavitaKAFE चे काव्य कार्यक्रम मोनालिसा कलाग्राममध्ये होत आहेत. तिथल्या संस्थापक लिसा पिंगळे यांनी या वाढत्या साहित्यिक कामाचे स्वागत केले आहे. त्या म्हणतात, "KavitaKAFE क्लासिक हिंदी साहित्याला चालना देत आहे आणि त्याचवेळी नव्या लेखकांनाही प्रोत्साहन देत आहे. या साहित्यिक प्रवासात त्यांच्यासोबत काम करायला आम्हाला खूप आनंद आहे, कारण सर्व कलाप्रकारांना प्रोत्साहन द्यावे असे आम्हाला वाटते."

रवी आचार्य, तेजल जैन, भक्ती साठे, राजश्री, प्रियदर्शिनी प्रज्ञान, चिन्मयी कात्रे, मेहा चोप्रा, निलोफर, बॉबी मित्तल, Devv, सार्थक सिन्हा, विनय गंगील, शाहबाज खान आणि विकास मोहन हे कवी मंचावर येणार आहेत. वैयक्तिक विचार, ओळखीचे सूर आणि एकाची असूनही अनेकांना आपलीशी वाटणाऱ्या गोष्टी, असा अनुभव भूले-बिसरे देईल, असे आयोजक सांगतात.

आठवणी अगदी वैयक्तिक असतात, पण कविता त्यांना सर्वांच्या करून टाकते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ