जरांगेंच्या क्लिपमधील आवाज कुणाचे? म्हस्केंनी भाजपच्या तीन नावांकडे बोट दाखवले
मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरून खळबळ उडाली असताना शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी क्लिपची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांत व सायबर सेलकडे जाण्याचे आवाहन केले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जारी केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन ते खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या हस्ते मनोज जरांगे यांना पाठवल्याचा उल्लेख आहे. जरांगे यांनी भर पत्रकार परिषदेत ही क्लिप ऐकवली आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे व भाजपवर हल्लाबोल केला. मात्र या क्लिपची पुष्टी झालेली नाही.
क्लिपमध्ये महिलांचे संभाषण ऐकू येते. त्यात एक महिला सांगते की जरांगे पाटील यांना ऑलरेडी 500 कोटी रुपये पोहोचले आहेत आणि हे पैसे श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत दिले आहेत. जरांगे पाटील विधानसभेत आमच्या फायद्याचे राहतील की नाही, याबाबत आपले मत वेगळे आहे आणि कॅलक्यूलेशन वेगळे आहे, असेही ती म्हणते. जरांगे हे फडणवीस यांना पर्सनल टार्गेट करत असल्याचाही उल्लेख क्लिपमध्ये आहे.
या प्रकरणावर शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले की, भाजपने या क्लिपबाबत स्पष्टीकरण द्यावे. दुसरीकडे भाजप प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी सांगितले की क्लिपची सत्यता तपासायला हवी, कारण ती एआय निर्मित क्लिपही असू शकते.
या सर्व प्रकारानंतर शिवसेना खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी ती सायबर सेलकडे पाठवायला हवी. मनोज जरांगेंनी ती क्लिप पोलिसांना, सायबर सेलला द्यावी. जरांगे आणि शिवसेना यांच्यात भांडण लावण्याचं काम कोण करतंय ते समोर येईल."
म्हस्के यांनी सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन केले. तसेच जरांगे पाटील यांनी विनाकारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
क्लिपमधील आवाजांबाबत म्हस्के म्हणाले की, हे आवाज भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी, निधी कामदार आणि आमदार अतुल भातखळकर यांचे असल्याचे दिसते. हे आवाज त्यांचेच आहेत का आणि ही क्लिप खरी आहे का, हे समोर आले पाहिजे, असे ते म्हणाले.
क्लिप खरी असेल आणि मित्र पक्षातील नेते आमच्या नेत्यांबद्दल अशी वक्तव्ये करत असतील, तर वरिष्ठांनी कारवाई करावी, असेही म्हस्के यांनी सांगितले. या सगळ्या षडयंत्रामागे कोण आहे, याच्या खोलापर्यंत जाण्याची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.