गोकुळ निवडणुकीत मुश्रीफ यांच्या मुलाचा पराभव, महायुतीला धक्का; मुश्रीफ म्हणाले, पराभव स्वीकारतो
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने बाजी मारली असून, चेअरमन नाविद मुश्रीफ यांचा पराभव झाला आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने या निवडणुकीत दणदणीत यश मिळवले. राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि गोकुळचे विद्यमान चेअरमन नाविद मुश्रीफ यांचा यात दारुण पराभव झाला. या निवडणुकीचे नेतृत्व हसन मुश्रीफ यांच्याकडे होते, म्हणूनच हा त्यांनाच बसलेला मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे. निकालानंतर मुश्रीफ यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्य लढत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातच होती. पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडी लढत होती, तर मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महायुती मैदानात होती. या निवडणुकीत 99 टक्के मतदान झाले होते. 25 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली तेव्हा सगळ्यांच्या मनात धाकधूक होती. पण निकालाने सर्वांनाच धक्का दिला. समविचारी आघाडीचे 13 उमेदवार निवडून आले, तर महायुतीचे 12 उमेदवार निवडून आले. पराभूत झालेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास नारायण पाटील आणि गोकुळचे विद्यमान चेअरमन नाविद मुश्रीफ यांचा समावेश आहे.
संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आपला पराभव झाला आहे, पण त्यामुळे खचून जाऊ नका, निराश होऊ नका, उद्यापासून आपण पुन्हा कामाला लागू या, असे मुश्रीफ यांनी म्हटले.
पराभवाबद्दल आत्मचिंतन करण्यासाठी उद्या संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले. सर्वांनी या बैठकीला उपस्थित राहून आत्मचिंतन करायचे आहे आणि पुढची रणनीती ठरवायची आहे, असेही ते म्हणाले. पदवीधर निवडणुकीसाठी आपण मोठी नोंदणी केली आहे, ज्यांची ज्यांची नोंदणी झाली आहे त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल कोल्हापुरात होते, त्यावेळी महायुतीचा उमेदवार निवडून देण्याचा शब्द आम्ही दिला आहे, तो आपल्याला पाळायचा आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.
झालेला पराभव आम्ही स्वीकारत आहोत, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत शेवटपर्यंत महायुतीत भांडणे सुरू होती, त्या भांडणानंतर आमची युती झाली, त्यामुळे कदाचित ही युती मतदारांना आवडली नसेल, असे ते म्हणाले. तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणाच्या भूमिकेतून गोकुळ दूध संघाच्या उत्कर्षासाठी लागेल ते सहकार्य करू, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.