गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

विरारमध्ये बंद फ्लॅटमध्ये तीन सख्ख्या भावंडांचे मृतदेह आढळले; मृत्यूपूर्वी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड

विरारमध्ये बंद फ्लॅटमध्ये तीन सख्ख्या भावंडांचे मृतदेह आढळले; मृत्यूपूर्वी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
समाज PT24 टीम

विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटीमधील फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि बहिणीचे मृतदेह सापडले; बोळींज पोलिसांचा तपास सुरू आहे.

वसई-विरार परिसरातून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरातील एका बंद फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि त्यांच्या बहिणीचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या तिघांनी विष घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ग्लोबल सिटीतील के 3 डी, गार्डन अॅव्हेन्यू या इमारतीच्या डी विंगमध्ये रूम क्रमांक 1203 मध्ये ही दुर्दैवी घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून या फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागली होती. त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी तातडीने इमारतीचे सचिव तसेच बोळींज पोलिसांना याची माहिती दिली.

माहिती मिळताच बोळींज पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला, तेव्हा तिथे तीन जणांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले.

मृत तिघे सख्खे बहीण-भाऊ आहेत. कुमार मनसुखलाल मेहता (वय 50), दिपेश मनसुखलाल मेहता (वय 52) आणि खेवणा मनसुखलाल मेहता (वय 48) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या कुटुंबातील एक भाऊ कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त होता. शिवाय हे कुटुंब काही काळापासून तीव्र आर्थिक अडचणींनाही तोंड देत होते. या दुहेरी अडचणीतून तिघांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती आणखी एक महत्त्वाची गोष्ट लागली आहे. मृत्यूपूर्वी या भावंडांपैकी एकाने आपल्या मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये आत्महत्येचा स्पष्ट उल्लेख असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी तो मोबाईल जप्त केला असून व्हिडिओमागील सत्य शोधण्याचे काम सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा केला आणि आवश्यक पुरावे गोळा केले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या बोळींज पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्येचा अंदाज सध्या प्राथमिक स्वरूपाचा आहे. शवविच्छेदन अहवाल आणि व्हिडिओची तपासणी झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

#पुणे#समाज#PT24#Society#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ