सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 321 | Very Poor 06:56 IST

एआयमुळे आगीपासून बचावाची यंत्रणा सक्षम होणार, संतोष वारिक यांचे मुंबईत प्रतिपादन

मुंबईतील पीएसपी-एएसआयएस कॉन्क्लेव्हमध्ये अग्निसुरक्षेत एआयच्या वापरावर चर्चा झाली. अलार्म, हायड्रंट्स आणि स्प्रिंकलर सेन्सर्सद्वारे अलर्ट मिळतात, असे संतोष वारिक यांनी सांगितले.

एआयमुळे आगीपासून बचावाची यंत्रणा सक्षम होणार, संतोष वारिक यांचे मुंबईत प्रतिपादन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) सुरक्षा यंत्रणांची देखरेख आणि नियंत्रण अधिक प्रभावी होणार आहे, असे महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे संचालक आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारिक यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निरीक्षणात एआय वापरले, तर संशयास्पद हालचाली ओळखता येतील आणि संभाव्य धोके वेळीच लक्षात घेऊन तातडीने प्रतिसाद देता येईल, असे ते म्हणाले. एआयमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम, प्रभावी आणि सुसज्ज होत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स आणि अमेरिकन सोसायटी फॉर इंडस्ट्रियल सिक्युरिटी (एएसआयएस) यांनी मिळून 'एआय इन सिक्युरिटी' या संकल्पनेवर 'पीएसपी-एएसआयएस कॉन्क्लेव्ह' आयोजित केला होता. मुंबईतील आयकॉनिका हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात 'अग्निसुरक्षेमध्ये एआयचा वापर' या विषयावर वारिक बोलत होते.

वारिक म्हणाले की, सध्या इमारतींची सुरक्षा आणि आगीपासून बचाव (फायर सेफ्टी) या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या झाल्या आहेत. कारखाने, कार्यालये किंवा मॉलमध्ये लोकांच्या गर्दीवर लक्ष ठेवण्यापासून संपूर्ण व्यवस्थापन एआयच्या मदतीने करता येते. इमारतींमधील आगीच्या सुरक्षा यंत्रणांवरही एआयद्वारे सहज नजर ठेवता येते.

सरकारने 'महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अँड लाइफ सेफ्टी मेजर्स ॲक्ट'मध्ये २०२३ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. इमारतीत आगीच्या सुरक्षेसाठी बसवलेल्या डिटेक्शन सिस्टीम्स, अलार्म, हायड्रंट्स आणि स्प्रिंकलर सेन्सर्समधून आपत्कालीन परिस्थितीत अलर्ट पाठवले जातात. त्यामुळे कोणतीही दुर्घटना झाली, तर अग्निशमन दलाचा प्रतिसाद लवकर मिळण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

प्रास्ताविकात सुनील बीडलम यांनी सांगितले की, पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स (पीएसपी) फोरम हे पुण्यातील कॉर्पोरेट, औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सुरक्षा, रिस्क मॅनेजमेंट आणि ऍनालिसिसचे काम करणाऱ्या व्यावसायिकांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. सुरक्षा व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या भू-राजकीय घडामोडी, सुरक्षारक्षकांशी संबंधित आव्हाने, प्रवेश नियंत्रण प्रणाली आणि आपत्कालीन स्थितीतील सज्जता अशा विषयांवर तिथे चर्चा होते. पुण्यासह मुंबई आणि इतर शहरांतही असे कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. 'सुरक्षा अवॉर्ड्स'सारख्या उपक्रमांतून सुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा फोरमतर्फे गौरवही केला जातो.

ब्रिगेडियर प्रीतपाल सिंग म्हणाले की, एआयच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि भविष्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी या कॉन्क्लेव्हमुळे दिशा मिळाली. आज लहान-मोठ्या सर्वच गोष्टी इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत. इंटरनेटमुळे एआयसारखे प्रभावी तंत्रज्ञान उपलब्ध झाले, तरी त्यावर योग्य नियंत्रण नसेल तर गैरप्रवृत्तीचे लोक त्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करू शकतात. म्हणून सुरक्षा क्षेत्रातील व्यावसायिकांनी एआयचे स्वरूप समजून घेणे, त्याचा योग्य वापर करणे आणि संस्थांची सुरक्षा भक्कम करण्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल, याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणालिनी चतुर्वेदी यांनी केले आणि मंगेश काटे यांनी आभार मानले. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे सहसंचालक किरण हत्याल, 'पीएसपी'चे सहसंस्थापक सुनील बीडलम व मंगेश काटे, बँक ऑफ बडोदाच्या सुरक्षा विभागाचे राष्ट्रीय प्रमुख ब्रिगेडियर प्रीतपाल सिंग, सिक्युरिटी शेल्स इंफोटेकचे संचालक महेश गव्हाणे, बायॉन अनॅलिटीक्सचे व्यवस्थापकीय संचालक राजीव नायर, सिमएक्सचे पूर्वेस गडा, 'एएसआयएस' मुंबई चॅप्टरचे समीर कुमार झा, तसेच सुरक्षा सेवा क्षेत्रातील नंदकिशोर भट, मोहित भूगणि, कुणाल भोगल, स्वप्नील कुटे, सुमित शहा, ब्रिगेडियर सुनील कुमार, मार्श मिरांडा, प्रमोद भिलारे, राकेश खेरवा, संपत सूर्यवंशी हे प्रमुख उपस्थित होते.

सुरक्षा सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एचएसबीसी बँक इंडियाचे उपाध्यक्ष (प्रोटेक्टिव्ह सिक्युरिटी) निलेश गाडेकर आणि हॉटेल ग्रँड हयात मुंबईचे सहायक सुरक्षा व्यवस्थापक संतोष भालके यांचा या वेळी गौरव करण्यात आला.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ