झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष, उमेश पाटील राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटनेत फेरबदल केले असून मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी, तर राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
राज्यभरात सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूक निकालांची चर्चा सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षसंघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. पक्षाचे (NCP) मुंबई अध्यक्षपद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त होते. आता या पदावर झिशान सिद्दीकी (zeeshan siddique) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झिशान हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आहेत. पार्थ पवार यांच्या हस्ते झिशान यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
दुसरीकडे, उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. देवगिरी या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पक्षाचे इतर नेते आणि पदाधिकारीही हजर होते. स्वर्गीय अजितदादा पवार यांचे विचार, आदर्श आणि जनसेवेचा वारसा पुढे नेत पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी उमेश पाटील यांनी निष्ठेने आणि समर्पणाने काम करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर झिशान सिद्दीकी यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे आभार मानले. ही जबाबदारी मिळणे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, असे ते म्हणाले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करणे हा आमचा अजेंडा आहे, असेही त्यांनी सांगितले. सुनेत्रा वहिनी माझ्यासाठी आईसारख्या आहेत आणि पार्थ पवार मोठ्या भावासारखे आहेत, असे झिशान यांनी म्हटले. या दोघांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन, असे सांगून त्यांनी पुढे म्हटले की, त्यांनी आधी मला विधान परिषदेची आमदारकी दिली आणि आता पक्षाचे मुंबई अध्यक्षपद दिले.
यावेळी झिशान सिद्दीकी यांनी अर्थमंत्रीपदाबाबतही भाष्य केले. अर्थखाते नेहमी अजितदादांकडे राहिले होते. आता हे पद सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार सक्षम आहेत, असा ठाम विश्वास आम्हाला आहे, असे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीविरोधात काम करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीविरोधात काम केलेल्या या पदाधिकाऱ्यांची यादी पक्षांतर्गत तयार करण्यात आली आहे. भाजपनेही एकनाथ शिंदे यांना या संदर्भात पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे त्याचा फटका निवडणुकीत महायुतीला बसला, असा ठपका या पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवसेनेने समजावून सांगूनही काही बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले नव्हते. अशा बंडखोरांवरही कठोर कारवाई व्हावी, अशी शिवसेनेतील काही नेत्यांची भूमिका आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.