वसईच्या भाजी मार्केटमध्ये मुळा, गाजर हातात घेऊन मॉडेल्सचा रॅम्प वॉक, व्हिडिओ व्हायरल
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
व्हिजन व्होग फॅशन वीकअंतर्गत वसईतील अंबाडी रोडवरच्या गजबजलेल्या भाजी मार्केटमध्ये मॉडेल्सनी रॅम्प वॉक केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
फॅशन शो म्हटलं की डोळ्यासमोर मोठा रॅम्प, महागडे डिझायनर कपडे, आकर्षक लाईटिंग आणि मॉडेल्सचा स्टाईलिश अंदाज येतो. पण सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच रॅम्प वॉक पाहायला मिळतोय. हा रॅम्प वॉक मुंबईच्या भाजी मार्केटमध्ये भरला होता आणि तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या वॉकमध्ये मॉडेल्सच्या हातात बॅग किंवा दागिने नव्हते. त्याऐवजी ते हातात मुळा, कोथिंबीर आणि गाजर घेऊन चालताना दिसत आहेत. कोणाच्या हातात मुळा होता, तर कोणाच्या हातात कोथिंबिरीची जुडी दिसत होती. काहींनी तर बाजारात मिळणाऱ्या वस्तूंचा वापर आपल्या पेहरावासाठी केला होता.
या फॅशन शोचं नाव व्हिजन व्होग फॅशन वीक असं ठेवण्यात आलं होतं. वसईतील अंबाडी रोडवर असलेल्या गजबजलेल्या भाजी मार्केटमध्ये हा अनोखा उपक्रम सादर करण्यात आला. मुंबईतील फॅशन मेंटॉर आणि मॉडेल साहिल सिंग यांनी ही संकल्पना मांडली. पारंपरिक फॅशन शोच्या चौकटीबाहेर जाऊन रोजच्या आयुष्यात दिसणाऱ्या वस्तूंचाही फॅशनमध्ये वापर करता येतो, हे दाखवणं हा त्यामागचा उद्देश होता.
या रॅम्प वॉकमध्ये तरूण आणि तरूणी अशा दोन्ही गटांतील मॉडेल्स सहभागी झाले होते. भाजी मार्केटमधील अरूंद गल्ल्यांमधून ते आत्मविश्वासाने कॅटवॉक करताना दिसले. त्यांच्या आजूबाजूला भाजी विक्रेते, दुकाने आणि खरेदीसाठी आलेले ग्राहक तिथेच होते आणि त्यांच्या अगदी मधूनच हा रॅम्प वॉक चालू होता.
या उपक्रमात व्हिजन व्होग अकॅडमीचे सुमारे 50 विद्यार्थी सहभागी झाले होते. या संकल्पनेमागे साहिल सिंग यांच्यासोबत कॅरिसा डी ब्रिटो, रोहित चौधरी आणि जतिन गामी हेही सहभागी होते.
साहिल सिंग यांनी या फॅशन शोचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पहाडी गाण्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या गाण्याला वेगळाच देसी रंग मिळाला आहे.
महागडे कपडे किंवा भव्य मंच नसला तरी कल्पना आणि आत्मविश्वासाच्या जोरावर फॅशन सादर करता येते, हे या उपक्रमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे भाजी खरेदीसाठी गजबजणाऱ्या मार्केटमध्ये अचानक रॅम्प वॉक पाहायला मिळाल्याने हा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.