शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

शहाड ब्रिजच्या श्रेयावरून उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेत जुंपली

शहाड ब्रिजच्या श्रेयावरून उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेत जुंपली छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 मुंबई टीम

मेट्रोनंतर आता साडेतीनशे कोटी रुपयांच्या प्रस्तावित शहाड ब्रिजच्या श्रेयावरून महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्प पाचचं श्रेय फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंच आहे, असं माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी म्हटलं होतं. सर्वात आधी मागणी केल्याचं श्रेय मी नक्की घेणार, पण जे काम केलेलं नाही त्याबद्दल खोटं बोलून क्रेडिट घेण्याची आपली सवय नाही, अशी परखड प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. नाव न घेता त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भिवंडीतले भाजपाचे आमदार महेश चौघुले यांना टोला लगावला होता.

हा वाद शांत होत नाही तोच आता शहाड ब्रिजच्या श्रेयावरूनही भाजप आणि शिवसेनेत राजकारण तापलं आहे. उल्हासनगरमध्ये मेट्रोपाठोपाठ आता शहाड ब्रिजवरूनही दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

साडेतीनशे कोटी रुपयांचा हा ब्रिज प्रस्तावित आहे. त्यासाठी पाठपुरावा भाजपानेच केला, असा दावा आमदार कुमार आयलानी यांनी केला आहे. दुसरीकडे, ही कामं खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळेच होत आहेत, असं सांगत शिवसेनेने भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. धनत्रयोदशीच्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर चांगलीच टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभेत उल्हासनगरच्या लोकांना मेट्रो देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याच भाषणाचा व्हिडिओ दाखवून भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी मेट्रो आणि शहाड ब्रिज या दोन्हींसाठी भाजपानेच पाठपुरावा केल्याचा दावा केला. त्यावर शिवसेनेने टोला लगावला की, नुसती कागदपत्रं दाखवून विकासकामं होत नाहीत, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो.

शिवसेनेच्या म्हणण्यानुसार खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळेच ही कामं मार्गी लागत आहेत. शिवसेना नेते कमलेश निकम यांनी भाजपच्या आमदारांवर निशाणा साधला. भाजपाने स्वतः केलेल्या कामाचं श्रेय जरूर घ्यावं, पण दुसऱ्याने केलेल्या कामाचं श्रेय घेऊ नये, असं ते म्हणाले.

यावर आमदार कुमार आयलानी यांनी वेगळाच आरोप केला आहे. उल्हासनगरमध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्यात जो वाद सुरू आहे, त्याला एक गट कारणीभूत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

धनत्रयोदशीच्या निमित्ताने शिवसेनेकडून 'श्रीमती ज्योती कलानी लाडकी विद्यार्थिनी योजने'चा शुभारंभ करण्यात आला. याच कार्यक्रमात मेट्रो आणि शहाड ब्रिजच्या श्रेयावरून दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटले. एकूणच, महायुतीतल्या या दोन पक्षांत विकासकामांच्या श्रेयावरून सध्या जोरदार जुंपलेली दिसते.

#मुंबई#PT24#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ