शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

महायुतीतील वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांना अमित शाह यांच्या महत्त्वाच्या सूचना

महायुतीतील वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांना अमित शाह यांच्या महत्त्वाच्या सूचना
रवींद्र चव्हाण | संग्रहित छायाचित्र | ABP Live
PT24 मुंबई टीम

विधानपरिषद निवडणुकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. महायुती अभेद्य ठेवण्यावर चर्चा झाली.

काही दिवसांपूर्वी राज्यात पाच जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत चव्हाण यांनी निवडणुकीतील कामाचा अहवाल शाह यांच्यासमोर सादर केला. महायुती अभेद्य कशी ठेवायची, यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

शाह यांनी चव्हाण यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या. महाविकास आघाडीचा नॅरेटीव्ह खोडून काढा, विरोधकांना जशास तसे उत्तर द्या आणि महायुती म्हणून विरोधकांना पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर द्या, असे शाह यांनी चव्हाण यांना सांगितले. शाह आणि चव्हाण यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. पाच पैकी तीन जागा महाविकास आघाडीने जिंकल्या, तर महायुतीला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. दोन्ही शिक्षक मतदारसंघांत भाजपने विजय मिळवला. मात्र इतर तीन जागांवर महायुतीतल्या मतभेदांचा फटका बसला, असे बोलले जात आहे. निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. विधानपरिषदेच्या या निकालाची चर्चा भाजपच्या वरिष्ठांपर्यंत गेली, आणि त्यानंतर चव्हाण यांनी शाह यांची भेट घेतली.

निवडणुकीदरम्यान महायुतीतले अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले होते. निवडणुकीआधी तिकिटावरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात रस्सीखेच झाली. पुण्यातील शिक्षक मतदारसंघात शिंदे गट आणि भाजप, दोघांनीही उमेदवार दिले होते. या मतभेदाचा फटका पुण्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांत दिसून आला. पुण्यातील शिक्षक मतदारसंघात भाजपने विजय मिळवला, पण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघातही अजित पवार गटाच्या तत्कालीन विद्यमान आमदाराला पराभवाचा सामना करावा लागला.

निकालानंतर भाजपचे नवनाथ बन यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. विधानपरिषदेतल्या महायुतीच्या कामगिरीला त्यांनी शिंदे गटाला जबाबदार धरले. त्यावर शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनीही बन यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांवरही टीका केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर चव्हाण आणि शाह यांची भेट झाली.

#मुंबई#PT24#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ