शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

ऑनलाईन पीक नोंदणी जमत नसेल तिथे ई-फेरफारने पाहणी, तलाठी स्तरावर तपासणी

ऑनलाईन पीक नोंदणी जमत नसेल तिथे ई-फेरफारने पाहणी, तलाठी स्तरावर तपासणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 राजकारण डेस्क

खरिपाची ऑनलाईन पीक नोंदणी जिथे शक्य नाही, तिथे ई-फेरफार प्रणालीतून पीक पाहणी होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाला निर्देश दिले आहेत.

तांत्रिक आणि भौगोलिक अडचणींमुळे खरिपाची ऑनलाईन पीक नोंदणी ज्या ठिकाणी करता येत नाही, तिथे आता ई-फेरफार प्रणालीतून पीक पाहणी केली जाणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून पीक नोंदणी रखडू नये म्हणून ही पाहणी तलाठी स्तरावर होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाला याबाबत निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील जवळपास ७० लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

फक्त दुर्गम भागातच नाही, तर भौगोलिक आणि तांत्रिक कारणांमुळे इतरत्रही खरिपाची ऑनलाईन पीक पाहणी करताना मोठ्या अडचणी येतात. अशा ठिकाणी ऑनलाईन नोंदणी जमत नाही. तिथे ई-फेरफारमधून पाहणी होणार असल्याने कोणतीही नोंद रखडणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

बावनकुळे म्हणाले की, सरकारने आज अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आदिवासी लोक जमिनी कसत आहेत, पण पट्ट्यावर त्यांचे नाव नाही आणि इतर योजनांतही त्यांचा समावेश नाही. राज्यातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या कारणांमुळे फॉर्मर आयडी नाही. महसूल विभागाकडे अशांसाठी एसओपी नव्हता. आता १ जानेवारी २०१५ पूर्वीचा एक जरी पुरावा असेल, तरी त्या शेतकऱ्याला फॉर्मर आयडी देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनिमित्त सरकारने १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना हे गिफ्ट दिले आहे, असेही ते म्हणाले.

बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार, १ जानेवारी २०१५ पूर्वी कोणत्याही प्रकारच्या जमिनी शेतकरी कसत असतील, तर त्याचे हस्तलिखित रेकॉर्ड केले जात आहे. जमीन सरकारची असली तरी माझा अधिकार आहे, असे सांगणाऱ्या सर्वांना फॉर्मर आयडी मिळणार आहे. पीक पाहणीसाठी ऑफलाईन पाहणीचा निर्णय घेतला असून १ लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या रखडलेल्या पीक पाहणी आता सोप्या होतील, असे ते म्हणाले.

दिवाळीबद्दल बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यातील सर्व मंत्र्यांनी आपापल्या भागात शेतकऱ्याच्या घरी दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला आहे. आम्ही लोहारी सांगवा गावात मुक्कामाला जात आहोत. अनेक वर्षांपासून रखडलेला प्रकल्प उद्या सुरू करून शेतकऱ्यांना भेट देणार आहोत. मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या घरी राहणार असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता तालुकास्तरावर राहणार आहे. आधी रुग्णांना जिल्हास्तरावर खूप फेऱ्या माराव्या लागायच्या, त्यामुळे तालुकास्तरावर झाले ते चांगले झाले, असेही त्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील जमीन सरकारला मिळावी आणि आमची जमीन रेल्वेला, यामुळे दिवाळीनिमित्त मोठा दिलासा मिळाला. गिरीश महाजन आणि त्यांच्या पत्नीची मागणी सरकारने पूर्ण केली, असे बावनकुळे म्हणाले.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आंदोलनाबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, या राज्यात हायड्रो प्रकल्प वरदान असतो, त्यामुळे आज स्वस्त वीज मिळते. हायड्रो प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कधीच होत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. सयाजी शिंदे यांचे म्हणणे काय आहे ते पाहू, एकूण किती झाडे लावायची ते सांगा, त्यासाठी आम्ही जमीन देऊ, असे ते म्हणाले. झाडतोड योग्य नाही, पण हायड्रो प्रकल्प परत जाणेही योग्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

#मुंबई#सियासत#PT24#Politics#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ