लाडक्या बहिणींना दिवाळी गिफ्ट? केवायसी न झालेल्या 81 लाख महिलांना 1500 रुपये देण्याची फडणवीस यांची हमी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
किसान सभेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवायसी रखडलेल्या सुमारे 81 लाख महिलांची तांत्रिक अडचण दूर करण्याची हमी दिल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. राज्यातील 81 लाख लाडक्या बहिणींना दिवाळी गिफ्ट मिळू शकते. काही कारणांमुळे त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यात आदिवासी आणि गरीब कुटुंबांतील महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. या महिलांना लवकरच 1500 रुपयांचा सन्माननिधी मिळू शकतो. हा हप्ता मिळवून देण्याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना फडणवीस यांनी हे आश्वासन दिल्याची माहिती समोर येत आहे.
अखिल भारतीय किसान सभेने कष्टकरी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढला होता. हा मोर्चा मुंबईकडे निघालेला असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावले होते. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर शिष्टमंडळासोबत साधकबाधक चर्चा झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पाच महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री हजर होते. विविध विभागांचे सचिवही उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या अडचणींबरोबरच किसान सभेने लाडक्या बहिणींचा मुद्दाही बैठकीत उपस्थित केला. राज्यातील अनेक महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही, हा मुद्दा त्यांनी जोरदारपणे मांडला आणि तांत्रिक अडचणी समोर आणल्या.
चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ई-केवायसी रखडलेल्या आणि प्रलंबित महिलांना दिलासा दिला. कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या किंवा ई-केवायसी पूर्ण न केलेल्या सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. जवळपास 81 लाख महिलांची तांत्रिक अडचण दूर केली जाईल, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाला याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
केवायसी नसल्यामुळे आर्थिक लाभापासून वंचित राहिलेल्या 81 लाख लाडक्या बहिणींना पुन्हा योजनेत सामावून घेतले जाणार आहे. केवायसी प्रक्रिया सुरू ठेवली जाणार असून सध्या बंद असलेले पोर्टल पुन्हा सुरू केले जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणींची केवायसी प्रक्रिया झालेली नाही, तसेच ज्यांची केवायसी होऊनही त्यांना सन्माननिधी मिळत नसेल, त्यांना तो लगेच मिळावा यासाठी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.