कांदिवलीतील ज्वेलर्समधून ५ लाखांची साखळी लांबवल्याचा आरोप; दिल्लीतून ४२ वर्षांचा बीटेक तरुण अटकेत
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कांदिवली पश्चिमेतील ज्वेलर्समधून सोन्याची साखळी लांबवल्याच्या आरोपावरून कांदिवली पोलिसांनी दिल्लीतून सतीश कुमार कृष्णप्रसाद केसरी याला अटक केली आहे.
मुंबईतील कांदिवली पश्चिम भागातल्या एका ज्वेलर्समधून ५ लाख रुपयांची सोन्याची साखळी लांबवल्याच्या आरोपावरून कांदिवली पोलिसांनी दिल्लीतून ४२ वर्षांच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. सतीश कुमार कृष्णप्रसाद केसरी असे या आरोपीचे नाव असून तो दिल्लीतील उत्तम नगर येथे राहतो. मूळचा तो बिहारचा रहिवासी आहे. सतीश कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक झालेला आहे. अशा सुशिक्षित तरुणाला अटक झाल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश रोजगाराच्या शोधात दिल्लीत आला होता. आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून त्याने नोकरी सांभाळत यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली, पण त्यात त्याला यश आले नाही. त्यानंतर नशीब आजमावण्यासाठी तो 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमातही सहभागी झाला. मात्र तो फक्त 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' फेरीपर्यंतच पोहोचू शकला आणि 'हॉट सीट'वर बसण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
परीक्षेत आणि कार्यक्रमात यश न आल्याने सतीशने पत्नीच्या मदतीने टुर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी कर्ज काढून त्याने चार ते पाच चारचाकी गाड्या घेतल्या आणि त्या ओला व उबरसारख्या कंपन्यांशी जोडल्या. पण हा व्यवसाय तोट्यात गेला आणि त्याच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला.
कर्जाची परतफेड करणे अशक्य झाल्याने त्याने गुन्हेगारीचा मार्ग धरला, असे समोर आले आहे. ग्राहक म्हणून नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात जायचे, दागिने बघण्याच्या बहाण्याने ते हातात घ्यायचे आणि संधी मिळताच पसार व्हायचे, अशी त्याची योजना होती. त्यानुसार गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी त्याने कांदिवली पश्चिमेतील मथुरादास रोडवरच्या पद्मावती ज्वेलर्सला लक्ष्य केले, असा आरोप आहे. ग्राहक बनून दुकानात गेलेल्या सतीशने ४३.२ ग्रॅम वजनाची आणि सुमारे ५ लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी बघण्याच्या बहाण्याने मागितली आणि संधी साधून तिथून पळ काढला.
पोलिसांना चकवण्यासाठी तो मुंबईतील एका हॉस्टेलमध्ये राहत असताना त्याने बनावट कागदपत्रे किंवा ओळखपत्र दिले होते. चोरीनंतर त्याने आपला मोबाईल फोन बंद ठेवला आणि तो थेट दिल्लीला निघून गेला. कांदिवली पोलिसांनी शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा माग काढला. अखेर तांत्रिक तपासाच्या जोरावर मुंबई पोलिसांच्या पथकाने दिल्लीत छापा टाकून त्याला अटक केली आणि चोरीची सोन्याची साखळी त्याच्याकडून जप्त केली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने दिंडोशी परिसरातही अशाच प्रकारे चोरी केल्याची कबुली दिली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून कांदिवली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.