२० दिवसांच्या बाळाच्या विक्रीचा भांडाफोड, मुंब्रा पोलिसांनी दहा आरोपींना केली अटक
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंब्र्यात अवघ्या २० दिवसांच्या नवजात बाळाची खरेदी-विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंब्रा पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणले, बाळाला सुखरूप ताब्यात घेतले आणि दहा आरोपींना अटक केली. याच प्रकरणात आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. नवजात बाळांच्या विक्रीचे मोठे रॅकेट या कारवाईमुळे समोर आले आहे.
बाळाचा व्यवहार आधी अडीच लाख रुपयांना ठरला होता. पुढे तोच सौदा वाढत जाऊन साडेसहा लाखांपर्यंत पोहोचला. बाळाच्या विक्रीचा हा प्रवास जालना ते रत्नागिरी असा सुरू होता.
कळवा येथील शांतीनगर परिसरात राहणारी अनिसा रफीक शेख मुंब्रा रेल्वे स्टेशनवर भीक मागते. तिच्या २० दिवसांच्या बाळाची विक्री झाली. तिच्या आरोपानुसार रेहान रिजवान शेख याने त्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. हा प्रकार बाहेर फुटू नये म्हणून फिर्यादी असलेल्या अनिसा यांना १ लाख ९५ हजार रुपये देण्यात आले. एवढेच नाही, तर आई आणि तिच्या बहिणीला वायरने बेदम मारहाण करून व्यवहाराचे पैसेही हिसकावून घेण्यात आले, असे समोर आले आहे.
अनिसा यांनी ५ नोव्हेंबर रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी बाळाला सुखरूप परत आणण्यासाठी एक पथक तयार केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी तपासासाठी पाच स्वतंत्र पथके तयार केली. महिला पोलीस निरीक्षक वृषाली पवार, पोलीस निरीक्षक शरद कुंभार आणि प्रशांत पाटील, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत आणि राम दळवी यांनी तपासाला वेग दिला.
मुंब्रा पोलिसांच्या या पथकांनी मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण आणि जालना येथे कारवाई केली. तपासात बाळाचा प्रवास मुंब्रा ते कल्याण आणि दिवा ते रत्नागिरीपर्यंत झाल्याचे उघड झाले. त्यानंतर रत्नागिरीतून बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली.
या प्रकरणात अटक केलेल्या सर्व दहा आरोपींना न्यायालयाने १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.