माझा मुलगा दारू असलेल्या पार्टीला कधीच जात नाही, तुकाराम मुंढे यांनी मांडली मुलांबद्दलची भूमिका
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलांबद्दल मोकळेपणाने सांगितले. मुलगा दारू असलेल्या पार्टीत जात नाही आणि मुलांनी योग्य मार्गानेच पैसे कमवावेत, असे ते म्हणाले.
राज्याच्या अन्न व औषध विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात कारवाया होत आहेत. अशातच मुंढे यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलांबद्दल मोठे विधान केले आहे.
मुंढे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मी माझ्या मुलांशी नेहमीच चर्चा करतो, असे त्यांनी सांगितले. आमच्यात कोणताही संकोच न ठेवता गप्पा होतात आणि मुले माझ्याशी मनमोकळेपणाने बोलतात, असे ते म्हणाले.
मुलाच्या मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्ट्यांबद्दल बोलताना मुंढे यांनी सांगितले की, अशा पार्ट्या मोठ्या प्रमाणावर होतात आणि तिथे दारू प्यायली जाते. पण अशा पार्ट्यांमध्ये त्यांचा मुलगा कधीच जात नाही. ज्या पार्टीत दारू प्यायली जाते, तिथे मी जाणार नाही, असे त्याचे विचार अगदी स्पष्ट आहेत, असे मुंढे यांनी म्हटले. तिथे जायचे की नाही, हा निर्णय त्याचा स्वतःचा असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुलाचा स्वतःचा वाढदिवस मात्र घरीच साजरा होतो, असे मुंढे यांनी सांगितले. एक तर आम्ही तो घरी साजरा करतो किंवा एखाद्या छोट्याशा ठिकाणी जाऊन साजरा करतो, असे ते म्हणाले. या वाढदिवसाला आठ ते दहा मित्र येतात आणि सर्वकाही अगदी मोजकेच असते. माझ्या मुलाची विचारसरणीच तशी आहे, असे त्यांनी नमूद केले.
मुंढे यांनी स्वतःबद्दलही सांगितले. मी ड्रिंक करत नाही आणि आमच्या घरात कोणीच ड्रिंक करत नाही. त्यामुळे त्यावर आमच्याकडे पैसे खर्च होत नाहीत. घरातच कोणी ड्रिंक घेत नाही, म्हणून ते इतरांना देण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले.
मुलांच्या शिक्षणाबाबत मुंढे म्हणाले की, त्यासाठी कितीही पैसे लागले तरी तो प्रश्नच नाही. शिक्षणावर कितीही पैसे खर्च करायची माझी तयारी आहे. भविष्यात माझी मुले किती पैसे कमावतील किंवा कमावतील की नाही, हे मला माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र ती स्वतःच्या मेहनतीवर आणि योग्य मार्गानेच पैसे कमावतील, याची मला खात्री आहे आणि त्याचा मला आनंदही वाटेल, असेही ते म्हणाले.
यापूर्वीच्या एका मुलाखतीत मुंढे यांनी म्हटले होते की, माझ्या सततच्या बदल्यांचा माझ्या मुलांवर नेहमीच परिणाम झाला आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.