यवतमाळमध्ये पावसाच्या खंडाने सोयाबीन करपले, किडींचाही हल्ला
यवतमाळ जिल्ह्यात पावसाने मोठा खंड घेतल्याने शेंगा भरण्याच्या अवस्थेतच सोयाबीन पीक करपू लागले असून ढगाळ वातावरणात किडींचा प्रादुर्भावही वाढला आहे.
आभाळ भरून येते, पण पाऊस काही बरसत नाही, अशी अवस्था यवतमाळ जिल्ह्यात सध्या आहे. पावसाने घेतलेल्या दीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील खरीप सोयाबीन पिकाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शेंगा भरण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत पिकाला पाण्याची गरज असतानाच जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने अनेक भागांत सोयाबीनची पाने पिवळी पडली असून झाडे कोमेजू लागली आहेत. यातच ढगाळ आणि दमट वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनचे सुमारे २ लाख ७२ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर यंदा सोयाबीनची पेरणी झाली असून, याच पिकाला आता पावसाच्या खंडाचा फटका बसत आहे. ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत पावसातील अनियमितता आणि दीर्घ खंड यांचा थेट परिणाम आता पिकांच्या अवस्थेवर दिसू लागला आहे.
यवतमाळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात सोयाबीन पिवळे पडले असून पिके कोमेजली आहेत. शेंगा भरण्याच्या अवस्थेत ओलावा न मिळाल्याने उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. दमट वातावरणामुळे सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत शेतकऱ्यांना पानांवर डाग, पिवळेपणा आणि किडींचा त्रास जाणवत आहे. कापूस पिकाचीही अशीच परिस्थिती असून, पावसाच्या भरवशावर असलेली कापसाची रोपे कोमेजत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, ते आपले पीक वाचवण्यासाठी शेतात धडपड करताना दिसत आहेत.
यंदा तब्बल ४ लाखांपेक्षा जास्त क्षेत्रात कापसाची पेरणी झाली असून, यापैकी ५० टक्के कापूस पेरणी क्षेत्रात कापसाची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी झाडांना फुलोरा आल्यानंतरही त्यांची वाढ होत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. यवतमाळ तालुक्यातील चिकणी कसबा येथील अल्पभूधारक शेतकरी दीपक तायडे यांच्याकडे ३ एकर शेती आहे. मागील वर्षी ओल्या दुष्काळामुळे नापिकी झाली होती आणि लग्नाला आलेल्या मुलीचे लग्न करता आले नव्हते.
पावसाअभावी जमिनीतील उपलब्ध ओलावा कमी होत असल्याने हलक्या जमिनीतील सोयाबीनला सर्वाधिक फटका बसत आहे. पाने पिवळी पडणे, झाडांची वाढ खुंटणे, पाने सुकणे आणि झाडे कोमेजणे अशी लक्षणे अनेक शेतांमध्ये दिसत आहेत. विशेषतः शेंगा भरण्याच्या अवस्थेतील पिकाला ओलावा न मिळाल्यास दाणे भरण्यावर थेट परिणाम होण्याची भीती आहे.
सोयाबीनच्या उत्पादनासाठी सध्याचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या अवस्थेत पुरेसा ओलावा मिळाल्यास शेंगांमध्ये दाणे भरण्यास मदत होते. मात्र पावसाचा खंड आणखी वाढला, तर शेंगा कमी भरणे, दाण्यांचा आकार लहान राहणे आणि परिणामी उत्पादन घटण्याचा धोका वाढणार आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले असून, पावसाचा खंड आणखी वाढला तर यंदाच्या सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसेल, अशी स्थिती आहे.