भारत-पाक सामन्यासाठी केवढी क्रेझ! जागा 34 हजार, अर्ज 84 लाख
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वर्ल्डकप 2027 मधील भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांसाठी आयसीसीकडे सुमारे 84 लाख अर्ज आले आहेत, तर जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमची क्षमता 34 हजार आहे.
आयसीसीने पुरुषांच्या वर्ल्डकप 2027 ची घोषणा नुकतीच केली आहे. पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून ही मोठी स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक संघ एकमेकांसमोर येणार आहेत. सामन्याला अजून वेळ असला, तरी चाहते आतापासूनच उत्सुक आहेत.
हा सामना दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे, ऐतिहासिक वांडरर्स स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याच्या तिकिटांसाठी क्रिकेट चाहत्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या स्टेडियमची एकूण प्रेक्षकक्षमता 34 हजार आहे. पण भारत विरुद्ध पाकिस्तान या फक्त एकाच सामन्यासाठी आयसीसीकडे 80 लाखांहून अधिक तिकिटांचे अर्ज आले आहेत. आयसीसीच्या आकडेवारीनुसार हा आकडा सुमारे 84 लाख आहे. स्टेडियमच्या क्षमतेपेक्षा कैक पटीने जास्त अर्ज आल्यामुळे तिकीट मिळवण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी चुरस लागली आहे.
स्टेडियमची क्षमता आणि एवढी प्रचंड मागणी पाहता सगळ्यांना तिकीट देणे शक्यच नाही. म्हणून तिकिटांचे वाटप अगदी पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी रँडम बॅलेट सिस्टीम वापरली जात आहे. या सिस्टीममधून अर्जदारांमधली नशीबवान चाहत्यांची निवड केली जाईल आणि त्यांना तिकिटे दिली जातील. त्यामुळे सगळ्यांना समान संधी मिळण्यास मदत होणार आहे.
क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान सामना हा नेहमीच चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय राहिला आहे. वर्ल्डकपमधील या सामन्याची तिकिटे घेण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली आहे. जगभरातील चाहत्यांमध्ये या महामुकाबल्याबद्दल मोठा उत्साह आहे. या सामन्याच्या तिकिटांच्या मागणीने सगळे जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेचा विचार केला, तर 193 देशांमधून 12 कोटींपेक्षा जास्त तिकिटांचे अर्ज आले आहेत.
आणखी एक आकडा लक्षात घेण्यासारखा आहे. 21 नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवरच वर्ल्डकपची फायनल होणार आहे. त्या अंतिम सामन्यासाठी आतापर्यंत सुमारे 79 लाख अर्ज आले आहेत. म्हणजेच अंतिम सामन्यापेक्षाही भारत-पाक साखळी सामन्याची तिकिटे मिळवण्यासाठी चाहत्यांमध्ये सर्वाधिक चुरस दिसत आहे.
दरम्यान, हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. हा सामना प्रत्येकी 6-6 ओव्हरचा खेळवण्यात आला. त्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने भारतीय संघाचा पराभव केला, त्यामुळे भारतीय चाहत्यांची थोडी निराशा झाली.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.