वर्ल्डकप २०२७ चे वेळापत्रक १ ऑक्टोबरला केपटाऊनमध्ये जाहीर होणार, तारीख लक्षात ठेवा
आयसीसी १ ऑक्टोबरला केपटाऊनमध्ये वर्ल्डकप २०२७ चे वेळापत्रक, मैदाने आणि तिकिटांचे दर जाहीर करणार आहे.
पुढच्या वर्षी होणाऱ्या पुरुषांच्या वर्ल्डकपचे अधिकृत वेळापत्रक आयसीसी लवकरच जाहीर करणार आहे. पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत या पुरुष वर्ल्डकपचे आयोजन आयसीसीकडून केले जात आहे. १ ऑक्टोबर २०२६ रोजी, म्हणजे गुरुवारी, दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे आयसीसी वर्ल्डकप २०२७ चा कार्यक्रम जाहीर करणार आहे. वर्ल्डकपची उत्सुकता शिगेला पोहोचली असून चाहते या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे या ठिकाणी होणार आहे. बरोबर एका वर्षाने, ऑक्टोबरच्या सुमारास, वर्ल्डकप सुरू होणार आहे. स्पर्धा २ ऑक्टोबर २०२७ रोजी सुरू होणार असून २१ नोव्हेंबर २०२७ रोजी तिचा शेवट होणार आहे. सुमारे दीड महिना चालणाऱ्या या स्पर्धेत जगातले आघाडीचे संघ वर्ल्डकप जिंकण्यासाठी एकमेकांसमोर उभे राहतील.
गुरुवारी केपटाऊनमध्ये होणाऱ्या या खास कार्यक्रमात फक्त सामन्यांचे वेळापत्रक आणि मैदानांची नावेच जाहीर होणार नाहीत. क्रिकेट चाहत्यांसाठी वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीट विक्रीची प्रक्रिया आणि तिकिटांचे दर हेही अधिकृतपणे सांगितले जाणार आहेत.
२०२७ च्या ५० ओव्हरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्डकपची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत १४ संघ खेळणार आहेत. त्यापैकी १० संघांची नावे ३० सप्टेंबर रोजी निश्चित होणार आहेत, कारण आयसीसीने थेट पात्रतेसाठी ३० सप्टेंबर ही कट-ऑफ तारीख ठरवली आहे.
आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ नंबर १ वर आहे आणि तो सहज पात्र ठरणार आहे. भारताशिवाय इतर महत्त्वाच्या देशांची क्रमवारीतील जागा अशी आहे: न्यूझीलंड क्रमांक २, पाकिस्तान क्रमांक ४, ऑस्ट्रेलिया क्रमांक ५, इंग्लंड क्रमांक ६, श्रीलंका क्रमांक ७, अफगाणिस्तान क्रमांक ८ आणि बांगलादेश क्रमांक ९.
हे १० संघ निश्चित झाल्यावर उरलेल्या ४ जागांसाठी इतर देशांमध्ये क्वालिफायर सामने होणार आहेत. नामिबिया हा या वर्ल्डकपचा सह-यजमान आहे, पण आयसीसीच्या नियमानुसार त्याला थेट प्रवेश दिलेला नाही. मुख्य स्पर्धेत जागा मिळवण्यासाठी नामिबियालाही क्वालिफायरमधूनच जावे लागणार आहे.