वर्ध्यात चोरीची बाईक यवतमाळमध्ये सापडली, आरोपीकडून आणखी पाच मोटार सायकली जप्त
वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये मोटार सायकल चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर यवतमाळ पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीकडून सहा मोटार सायकली जप्त केल्या आहेत.
वर्धा शहर पोलीस स्टेशनला प्रफुल कृष्णराव रामटेके (वय 47, रा. मीरा नगर वार्ड नं. 5, सिंधी मेघे, वर्धा) यांनी तोंडी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार 17 ऑगस्ट 2026 रोजी रात्री साधारण आठ वाजता ते स्वतःची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल (क्रमांक एमएच 32 एल 737) घेऊन बजाज चौकातील भाजी बाजारात भाजीपाला घ्यायला गेले होते.
बाजाराच्या पहिल्या गेटजवळ असलेल्या केळाच्या दुकानाजवळ त्यांनी गाडी उभी केली आणि भाजीपाला घ्यायला गेले. भाजीपाला घेऊन साधारण रात्री सव्वाआठ वाजता ते परत आले, तेव्हा त्यांची मोटार सायकल जागेवर दिसली नाही. आजूबाजूला शोधाशोध करूनही गाडी सापडली नाही. काळ्या रंगाची, टाकीवर सिल्वर पट्टा असलेली आणि साधारण 15,000 रुपये किंमतीची ही गाडी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे रामटेके यांनी पोलीसांना सांगितले. या तक्रारीवरून वर्धा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र हाडके आणि त्यांचे पथक तपास करत आहे.
या प्रकरणात वृषभ शंकरराव टेकाम (वय 36, रा. येरणगाव, ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ) या आरोपीला यवतमाळ पोलीसांनी अटक केली आहे. वर्ध्याहून ही मोटार सायकल चोरल्याचे आरोपीने पोलीसांना सांगितल्याचे समजते. आरोपीच्या ताब्यातून पीसीआर दरम्यान त्याच्या शेताजवळून आणखी पाच मोटार सायकली आणि एकूण सहा गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
जप्त केलेल्या गाड्यांमध्ये काळ्या रंगाची, पांढरा निळा पट्टा असलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एमएच 32 एल 0737 (किंमत 25,000 रुपये), तशाच रंगाची स्प्लेंडर क्रमांक एमएच 32 एम 6502 (किंमत 30,000 रुपये), स्प्लेंडर क्रमांक एमएच 32 ई 4195 (किंमत 30,000 रुपये), स्प्लेंडर क्रमांक एमएच 32 एम 6851 (किंमत 30,000 रुपये) आणि स्प्लेंडर क्रमांक एमएच 29 एसी 3337 (किंमत 30,000 रुपये) यांचा समावेश आहे. याशिवाय काळ्या रंगाची बजाज प्लॅटिना मोटार सायकल क्रमांक एमएच 32 एल 2496 ही सुमारे 1,75,000 रुपये किंमतीची गाडीही जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर, पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र हाडके, पोलीस अंमलदार राजेश डाळ, संतोष ईघारे, चेतन दुबे तसेच चालक अझीम शेख आणि शशिकांत मुंढे यांचा या कारवाईत सहभाग होता. पुढील तपास वर्धा पोलीस करत आहेत.