वर्धेत म्युल बँक खात्यांद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
वर्धा सायबर पोलिसांनी अकोला अर्बन बँकेतील संशयास्पद खात्यांची चौकशी करून म्युल खाती वापरणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला असून दोन आरोपींना अटक झाली आहे.
वर्धा सायबर पोलीस स्टेशनने म्युल बँक खात्यांचा गैरवापर करून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्र सायबर आणि 14C म्हणजेच Indian Cyber Crime Coordination Centre कडून पोलिसांना संशयास्पद बँक खात्यांची एक यादी मिळाली होती. या यादीच्या आधारे पोलिसांनी अकोला अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड, शाखा वर्धा येथील खात्यांची सखोल चौकशी सुरू केली.
चौकशीत ही खाती सायबर फसवणुकीसाठी वापरली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे अपराध क्रमांक १७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि ६१(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(D) अन्वये आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
तपासात अकोला अर्बन बँकेतील काही खात्यांमधून संशयास्पद व्यवहार होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणातील आरोपी वर्धा येथे राहणारे ४२ वर्षीय नवीन सुरेश आहुजा आणि २८ वर्षीय आशिष उर्फ आशू श्यामकुमार दुब्बानी यांनी इतर साथीदारांसोबत संगनमत करून सर्वसामान्य नागरिकांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते, असा पोलिसांचा आरोप आहे. या आमिषाला बळी पडलेल्या नागरिकांच्या नावे या दोघांनी बँक खाती उघडून घेतली, असे पोलिसांनी सांगितले.
ही खाती नंतर सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम जमा करण्यासाठी, ती रक्कम दुसऱ्या खात्यांत वळवण्यासाठी आणि रोख रक्कम काढण्यासाठी वापरली जात होती, असे तपासात समोर आले. आरोपी आशिष उर्फ आशू श्यामकुमार दुब्बानी हा सालोड येथील महिलांच्या नावे बेकायदेशीरपणे सिमकार्ड बनवून देत असल्याचा आणि आरोपी नवीन आहुजा हा साक्षीदार महिलांच्या नावे बँक खाती उघडून फसवणुकीची रक्कम वळवण्यासाठी वापरत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणात नवीन सुरेश आहुजा आणि आशिष उर्फ आशू श्यामकुमार दुब्बानी या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सायबर पोलीस स्टेशन, वर्धा करत आहे.
पोलीस अधीक्षक, वर्धा सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक, वर्धा सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक आयेशा मुल्ला, पोलीस हवालदार वैभव कटोजवार, अमित शुक्ला, ओमप्रकाश कोकोडे, रणजित जाधव, पोलीस शिपाई पवन झाडे, महिला पोलीस शिपाई लेखा राठोड आणि आरती पारीसे तसेच सायबर पोलीस स्टेशन, वर्धाचे पथक सहभागी होते.
वर्धा सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सायबर फसवणुकीपासून सावध राहावे. कोणत्याही अनोळखी किंवा संशयित व्यक्तीला आपले बँक खाते, एटीएम कार्ड, ओटीपी, सिमकार्ड किंवा आर्थिक व्यवहारांचे अधिकार देऊ नये. कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडू नये. फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर किंवा जवळच्या सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.