वर्धा रेल्वे स्टेशनजवळून तरुणीचे अपहरण, सामूहिक बलात्काराचा आरोप; पाच जणांना अटक
वर्धा रेल्वे स्टेशनवरून एका २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या पाच जणांना वर्धा शासकीय रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
वर्धा रेल्वे स्टेशनच्या मेन गेट बुकिंग ऑफिसजवळ बसलेल्या एका २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. लोहमार्ग नागपूरचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साधारण दोन वाजता ही तरुणी वर्धा रेल्वे स्टेशनच्या मेन गेट बुकिंग कार्यालयाजवळ बसलेली असताना एका ऑटोरिक्षा चालकाने तिला जबरदस्तीने उचलून ऑटोत बसवले आणि वर्धा शहरात घेऊन गेला, असा आरोप आहे. तिथून तिला एका अंधाऱ्या जागी नेण्यात आले आणि आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे, अशी पोलिसांची तक्रार सांगते. त्यानंतर सगळे आरोपी तिथून पळून गेले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर पीडित तरुणीने वर्धा शासकीय रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये येऊन पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केली.
वर्धा रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार विरसेन चंहादे यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा क्रमांक २७५/२०२६ अंतर्गत बीएनएसच्या कलम ७०(१) खाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला. संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी पीडित तरुणीवर बळजबरीने आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितलेली आरोपींची नावे अशी - आरोपी नंबर एक विक्रम उर्फ गोलू दिनेशराव खंडाळे (वय २८, व्यवसाय ऑटोचालक, राहणार आर्वीनाका इंदिरा नगर झोपडपट्टी, वार्ड नंबर १, वर्धा). आरोपी नंबर दोन ओम उर्फ दुर्लभ सुनील बावणे (वय १८, व्यवसाय बॅनर फिंटींग, राहणार मांगतपुरा गोंडप्लॉट, शिवाजी चौक, वर्धा). आरोपी नंबर तीन शेख मोहसिन उर्फ मुसा शेख कासम कनोजे (वय २९, व्यवसाय ऑटोचालक, राहणार आर्वीनाका गजानन नगर वार्ड नंबर १, वर्धा). आरोपी नंबर चार शेख साहिल शेख शरीफ (वय ३२, व्यवसाय ऑटोचालक, राहणार महादेवपुरा ताज वेल्डिंगजवळ, वार्ड नंबर १४, वर्धा). पाचवा आरोपी विधीसंघर्षग्रस्त बालक असून त्याचे वय १७ वर्ष असून तो वर्धामध्येच राहतो.
चार प्रौढ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे, असे शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन वर्धाकडून सांगण्यात आले. ही कारवाई मंगेश शिंदे (पोलीस अधीक्षक, लोहमार्ग नागपूर), डॉ. दत्ताराम राठोड (अप्पर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग नागपूर), शंकर शेळके (उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग अकोला) आणि पंजाबराव डोळे (स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा) यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. विरसेन चंहादे (पोलीस निरीक्षक, प्रभारी पोलीस अधिकारी, शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा) यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज ढोके (प्रभारी पोलीस अधिकारी, रेल्वे स्टेशन बडनेरा), पोलीस उपनिरीक्षक अंगद कोतवाड (रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा), पोलीस उपनिरीक्षक नितीनकुमार जाधव आणि पोलीस हवालदार संतोष वडगोरे, डेहनकर, अशोक हनवंते यांच्यासह गोंधळे, घरडे, सहारे, प्रज्वल दाभाडे, गौतम शिरसाठ, अजय मनस्कार, निलेश काळे व असलम केंद्रे यांनी ही कारवाई पूर्ण केली.