वर्ध्यात सोनार दुकानांतून हातचलाखीने दागिने चोरणारी महिला स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
वर्धा शहरातील दोन सराफा दुकानांतून सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या सराईत महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगणघाट येथून ताब्यात घेतले असून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वर्धा पोलीस स्टेशन (शहर) हद्दीतील सराफा दुकानांमध्ये हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका सराईत महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा च्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी महिला आरोपीने चोरलेला सोन्याचा मुद्देमाल जप्त करत दोन गुन्ह्यांची उकल केली आहे.
वर्धा शहर हद्दीतील दोन वेगवेगळ्या सोनारांच्या दुकानांमध्ये 12 सप्टेंबर 2026 आणि 20 सप्टेंबर 2026 रोजी हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी वर्धा (शहर) पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक 1585/2026 आणि 1589/2026 अन्वये कलम 303(2) बी.एन.एस.खाली गुन्हे नोंदवण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना, घटनास्थळांचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित महिला आरोपी हिंगणघाट येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने तात्काळ हिंगणघाट गाठून संशयित महिला आरोपीची माहिती काढली आणि तिला तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. संशयित आरोपीचे नाव शेख रूमाना उर्फ शबाना उर्फ मुस्कान शेख आरिफ (वय 29, रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट) असे आहे.
महिला आरोपीची सखोल आणि कसून चौकशी केली असता, तिने वर्धा शहरात दोन ठिकाणी हातचलाखीने सोने चोरल्याची कबुली पंचांसमोर दिली. चोरलेले दागिने तिने हिंगणघाट येथील ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये मुलगी आजारी असून उपचारासाठी पैशांची तातडीची गरज असल्याचे सांगून गहाण ठेवले होते, असे तपासात समोर आले. पोलीस पथकाने पंचांसोबत संबंधित सराफा दुकानांमध्ये जाऊन चौकशी केली आणि जप्ती पंचनाम्यानुसार मुद्देमाल ताब्यात घेतला. यात 1.630 ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स किंमत 22,900 रुपये आणि 2.620 ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स किंमत 36,800 रुपये असे एकूण 59,600 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले.
महिला आरोपीला ताब्यात घेऊन जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर तपासासाठी वर्धा (शहर) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वर्धा (शहर) पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू, पोलीस अंमलदार मनोज धात्रक, महादेव सानप, हर्षल सोनटक्के, अभिषेक नाईक, पल्लवी बोबडे या स्थानिक गुन्हे शाखा वर्धाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सायबर सेल वर्धाचे प्रतिक वांदिले यांचा सहभाग होता.
नागरिकांनी आपल्या दागिन्यांची आणि सामानाची काळजी घ्यावी, तसेच संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन वर्धा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.