वर्धा येथे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सतर्फे कॉलेजमध्ये जनजागृती कार्यक्रम
"DRUGS FREE WARDHA" अभियानांतर्गत अॅन्टी नार्कोटिक टास्क फोर्स, वर्धा यांनी पिपरी येथील कृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घेतला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वर्धा जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण पाहून त्याची गंभीर दखल घेतली आहे. विशेषतः तरुण पिढी या घातक व्यसनाच्या विळख्यात अडकताना दिसत आहे, आणि त्याचा वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यावर, कुटुंबावर आणि समाजावर होत आहे. अंमली पदार्थांच्या सेवनाने माणसाची शारीरिक आणि मानसिक तब्येत तर बिघडतेच, पण त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीलाही चालना मिळते. या पार्श्वभूमीवर "DRUGS FREE WARDHA" अभियानांतर्गत ०९/१०/२०२६ रोजी अॅन्टी नार्कोटिक टास्क फोर्स, वर्धा यांच्याकडून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
हा कार्यक्रम पिपरी (वर्धा) येथील श्री. कृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयात झाला. "Drugs Free Wardha" या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम सुरक्षित भविष्याची दिशा दाखवण्यासाठी आणि नशामुक्त समाज घडवण्यासाठी राबवण्यात आला. वर्धा जिल्हा पोलीस दलाने तयार केलेला NDPS Awareness video यावेळी दाखवण्यात आला. तसेच PPT presentation दाखवून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.
पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी यांनी कार्यक्रमाला आलेल्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृतीपर मार्गदर्शन केले. कॉलेजमधील मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने दामिनी पथकातील महिला पोलीस अंमलदार यांनीही मार्गदर्शन केले. सायबर सेक्युरीटीबाबत सायबर सेल, वर्धा यांच्याकडून माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी मिळून राष्ट्रगीत म्हटले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
"नशा सोडा, जीवन जोडा", "सुसंस्कृत समाज घडवूया" आणि "नशामुक्त वर्धा घडवूया" असा महत्त्वाचा संदेश या कार्यक्रमातून कॉलेजमधील विद्यार्थ्यांना देण्यात आला. वर्धा शहर प्रगत, सुरक्षित आणि सशक्त व्हावे, यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे, असे आवाहन वर्धा पोलिसांनी केले.
हा अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशीव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, अॅन्टी नार्कोटिक टास्क फोर्स, वर्धा येथील पोउपनि सिनुकुमार बानोत आणि टास्क फोर्समधील पोलीस अंमलदार उपस्थित होते. त्याचबरोबर दामिनी पथक, वर्धा आणि सायबर सेल, वर्धा यांचे सदस्यही हजर होते. कॉलेजचे प्राचार्य, संपूर्ण प्राध्यापक वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.