वर्ध्यात एटीएम बदलून ४८ हजार लंपास करणाऱ्या आरोपीला अटक
एटीएम कार्ड बदलून बँक खात्यातून पैसे काढल्याची फसवणूक, वर्धा पोलिसांकडून एका आरोपीला अटक तर दुसऱ्याचा शोध सुरू
वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये सौ. माधुरी अंबादास गवई (वय ३५, रा. पंकज कॉलनी, स्वामी समर्थ मंदीर, अमरावती) यांनी एटीएम फसवणुकीची तक्रार दिली होती. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास त्या ट्रेनने अमरावतीहून वर्ध्यात आल्या होत्या. जवळ पैसे नसल्याने सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्या रेल्वे स्टेशनजवळील एचडीएफसी बँकेच्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेल्या.
त्या एटीएममध्ये असतानाच दोन अनोळखी व्यक्ती आत आल्या. गवई यांनी दोन हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एका व्यक्तीने त्यांना सांगितले की व्यवहार पूर्ण झालेला नाही आणि स्लिप बाहेर आल्यावरच तो पूर्ण होईल. या बतावणीने गवई यांनी पुन्हा कार्ड मशीनमध्ये टाकले. याचवेळी काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेल्या आरोपीने त्यांची दिशाभूल करून हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड घेतले आणि त्याऐवजी दुसरेच एटीएम कार्ड त्यांच्या हातात देऊन तो निघून गेला.
काही वेळाने गवई दवाखान्यात जात असताना त्यांच्या मोबाइलवर युको बँकेच्या खात्यातून पाच व्यवहारांद्वारे एकूण ४८ हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. दोन अज्ञात आरोपींनी एटीएम कार्ड बदलून हातचलाखीने ही फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. या तक्रारीवरून वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १२५७/२०२६ अन्वये बीएनएस २०२३ च्या कलम ३१८(४) आणि ३(५) खाली गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास वर्धा स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. फिर्यादीने घटनेच्या वेळी सांगितलेल्या वर्णनावरून एटीएममधील एका आरोपीबाबत माहिती मिळाली. हा आरोपी जमशेद अली शौकत अली (रा. जामा मस्जिदजवळ, बाबरी, जिल्हा शामली, उत्तर प्रदेश) असल्याचे समजले. ही माहिती वरिष्ठांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या आदेशाने एक पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले, मात्र आरोपी तेथे घरी न आढळल्याने पथकाने वर्धा परिसरातच शोध सुरू ठेवला.
१६ सप्टेंबर २०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती विनाक्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या टीव्हीएस अपाची मोटरसायकलवरून सेवाग्राम रेल्वे स्टेशन परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे कळले. या परिसरात पाहणी केली असता जमशेद अली शौकत अली (वय ४५) हा तेथे सापडला. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, हा गुन्हा त्याने त्याचा साथीदार सावेज अली (रा. गंगेरू, जिल्हा शामली, उत्तर प्रदेश) याच्यासोबत केल्याचे त्याने सांगितले.
आरोपीच्या ताब्यातून व अंगझडतीत ५०० रुपयांच्या नोटांमधील एकूण ४८ हजार रुपये रोख, घटनेच्या वेळी वापरलेली लाल पट्टा असलेली पांढऱ्या रंगाची विनाक्रमांकाची टीव्हीएस अपाची मोटरसायकल (किंमत १ लाख ५० हजार रुपये), एक काळ्या रंगाचे हेल्मेट (किंमत १ हजार रुपये) आणि कॅनरा बँक व युनियन बँकेचे प्रत्येकी एक एटीएम कार्ड असा एकूण १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासासाठी आरोपीला वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी जमशेद अली शौकत अली याला अशा प्रकारचे गुन्हे करण्याची सवय असून त्याच्याकडून इतर जिल्ह्यांत तसेच इतर राज्यांतही असे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राहुल इटेकार, पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी यांच्यासह पोलीस अंमलदार सचिन इंगोले, भूषण निघोट, नरेंद्र पाराशर, धर्मेंद्र अकाली, विक्रम काळमेघ, अमोल नगराळे, मंगेश चावरे, गोविंद मुंडे, अरविंद इंगोले, राहुल अधवाल, रितेश गेटमे आणि मिथुन जिचकार या वर्धा स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने ही कारवाई केली.