उल्हासनगरमध्ये व्यावसायिकाचे अपहरण, 50 लाखांची खंडणी वसूल; पाच आरोपी अटकेत, दोघे फरार
कल्याणच्या व्यावसायिकाचे अपहरण करून कुटुंबाकडून 50 लाख रुपये उकळल्याच्या प्रकरणात उल्हासनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली, तर दोन आरोपी अजून फरार आहेत.
उल्हासनगर पोलिसांनी एका व्यावसायिकाच्या अपहरणाचे आणि 50 लाख रुपयांच्या खंडणीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या इस्टेट एजंट सचिन शिरसाट यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत.
कल्याणमध्ये राहणारे व्यावसायिक जयराम नेहलानी हे काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमधील गोल मैदान परिसरात असताना त्यांचे अपहरण झाले. पोलिसांच्या तपासानुसार अपहरणकर्त्यांनी नेहलानी यांच्या कुटुंबीयांशी संपर्क करून त्यांच्या सुटकेसाठी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. व्यावसायिकाच्या सुरक्षेची चिंता वाटल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी आरोपींनी सांगितल्याप्रमाणे कल्याणमध्ये जाऊन एका व्यक्तीला मागितलेली रक्कम दिली.
पैसे घेतल्यानंतर त्या व्यक्तीने नेहलानी यांच्या नातेवाईकाला काही वेळात नेहलानी घरी पोहोचतील असे सांगितले आणि 'थँक्यू अंकल' असे म्हणत तिथून निघून गेला, अशी माहिती समोर आली आहे.
नेहलानी यांच्या अपहरणाची माहिती उल्हासनगरचे डीसीपी सचिन गोरे यांना मिळताच पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी 10 स्वतंत्र पोलीस पथके तयार करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, आरोपींच्या हालचाली आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली.
तपासाची साखळी जोडत पोलीस खडवली परिसरात पोहोचले आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. अखेर पोलिसांना जयराम नेहलानी यांचा ठावठिकाणा सापडला आणि त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. या कारवाईत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले गेले. त्याच्या चौकशीतून पोलिसांना या प्रकरणातील इतर आरोपींची माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले.
पुढील तपासात नेहलानी यांच्या ओळखीतील इस्टेट एजंट सचिन शिरसाट हा या अपहरणाचा कथित मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. पोलिसांच्या आरोपानुसार शिरसाटने काही तरुणांना सोबत घेऊन टोळी बनवली आणि नेहलानी यांच्या अपहरणाचा कट रचला. घटनेनंतर तो फरार झाला होता, मात्र पोलिसांनी शोध घेऊन त्यालाही अटक केली.
या प्रकरणात अनिल जगताप, विशाल चंद्रमोरे, रमेश जाधव, सचिन शिरसाट आणि राहुल सोनी या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर सतीश दोंदे आणि मयूर दराने हे दोन संशयित आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी तपास सुरू आहे.
या अपहरणामागील नेमके आर्थिक वाद किंवा इतर कारण काय होते, आरोपींनी अपहरणाचे नियोजन कसे केले, 50 लाख रुपयांच्या खंडणीच्या रकमेचे पुढे काय झाले आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास उल्हासनगर पोलीस करत आहेत. तसेच आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.