उल्हास कामटे यांच्या निधनाची अफवा खोटी, प्रीमियरला आला होता पॅनिक अटॅक
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
'चिकन लेग पीस'चे व्हिडीओ बनवणारे इन्फ्लुएन्सर उल्हास कामटे यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून आपण पूर्णपणे ठीक आणि जिवंत असल्याचे सांगितले आहे.
सोशल मीडियावर 'चिकन लेग पीस'चे व्हिडीओ बनवून लोकप्रिय झालेले इन्फ्लुएन्सर उल्हास कामटे सध्या चर्चेत आले आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होती, तसा दावाही केला जात होता. पण ही बातमी खोटी आहे. कामटे यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून या वृत्ताचे खंडन केले असून आपण पूर्णपणे ठीक आणि जिवंत असल्याचे स्पष्ट केले आहे.
अफवा सुरू झाली ती एका व्हिडीओमुळे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात होता. त्यात उल्हास कामटे यांची प्रकृती बिघडल्याचे आणि त्यांना रुग्णालयात नेले जात असल्याचे दिसत होते. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते गेले, अशी चर्चा सुरू झाली. अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल पोस्टही शेअर केल्या. पण या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे आता उल्हास यांनीच स्पष्ट केले आहे.
मग त्या व्हिडीओतला प्रसंग नेमका काय होता? कामटे यांनी व्हायरल व्हिडीओमागची नेमकी घटना सांगितली आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या दिवशी तिथे उपस्थित असलेले काही लोकही दिसत आहेत. त्यांच्या माहितीनुसार हा प्रसंग 'जड-फूंक' या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान घडला होता.
चित्रपट पाहिल्यानंतर त्यातल्या भयावह दृश्यांमुळे उल्हास कामटे यांना अँक्झायटी अटॅक, म्हणजेच पॅनिक अटॅक आला आणि ते काही काळ बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि काही तासांतच त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली.
'जड-फूंक' चित्रपटाच्या टीममधील एका सदस्यानेही त्या दिवसाचा प्रसंग सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, उल्हास कामटे यांनी सुरुवातीला भयपट पाहायला नकार दिला होता. पण विनंती केल्यानंतर ते प्रीमियरला आले. चित्रपटातली भीतीदायक दृश्ये पाहिल्यावर त्यांना पॅनिक अटॅक आला आणि ते बेशुद्ध झाले. मग दिग्दर्शक राजन वर्मा यांच्यासह चित्रपटाच्या टीमने त्यांना रुग्णालयात नेले.
तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आणि काही तासांत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या निधनाबद्दल पसरत असलेल्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उल्हास कामटे यांनी स्वतः व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या मनातला संभ्रम दूर केला आहे. त्यामुळे 'चिकन लेग पीस' फेम उल्हास कामटे यांच्या निधनाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले जात आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.