एसी डब्यातून गांजाची तस्करी, 22.440 किलो माल जप्त
नागपूर रेल्वे सुरक्षा दलाच्या सीआयबी पथकाने ट्रेनच्या एसी डब्यातून तस्करी करत असल्याच्या संशयावरून दोन आरोपींना पकडले.
रेल्वेच्या एसी डब्याचा वापर गांजाची तस्करी करण्यासाठी करत असल्याच्या संशयावरून दोन आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाच्या क्राइम इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच सीआयबी पथकाने पकडले. या दोघांकडून एकूण 22.440 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 11.22 लाख रुपये सांगितली जात आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख आफिर साधू मलिक (वय 22, रहिवासी गजपति, ओडिशा) आणि टुकुना सोसाइड तनती (वय 23) अशी झाली आहे.
नागपूरच्या सीआयबीला अगोदरच अशी माहिती मिळाली होती की ट्रेन क्रमांक 12843 पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसच्या बी-5 आणि बी-6 या एसी डब्यांमधून दोन प्रवासी मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन प्रवास करत आहेत. या माहितीच्या आधारे सीआयबीचे खास पथक ट्रेनमध्ये चढले आणि सिंदी-वर्धा या रेल्वे सेक्शनदरम्यान त्यांनी पाळत ठेवण्यास आणि तपासणी करण्यास सुरुवात केली.
तपासणी सुरू असताना बी-5 डब्यातील बर्थ क्रमांक 19 वर प्रवास करणारा आफिर साधू मलिक आणि बी-6 डब्यातील बर्थ क्रमांक 16 वर बसलेला टुकुना तनती यांच्या हालचाली पथकाला संशयास्पद वाटल्या. पथकाने दोघांकडे त्यांच्या सामानाबाबत चौकशी केली, तेव्हा दोघेही घाबरले आणि आपल्या सामानाबद्दल समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.
यामुळे संशय अधिकच बळावला आणि दोन्ही आरोपींना त्यांच्या सामानासह वर्धा रेल्वे स्टेशनवर उतरवण्यात आले. स्टेशनवर उतरवल्यानंतर त्यांच्या ट्रॉली बॅगची झडती घेण्यात आली. या झडतीत आफिर मलिकच्या बॅगेतून 8.150 किलो गांजा तर टुकुना तनतीच्या बॅगेतून 14.290 किलो गांजा सापडला.
अशा प्रकारे सीआयबी पथकाने दोन्ही आरोपींकडून मिळून एकूण 22.440 किलो गांजा, दोन ट्रॉली बॅग आणि दोन मोबाईल फोन जप्त केले. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी तसेच जप्त केलेला माल लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
या कारवाईमुळे रेल्वेच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नेटवर्कवरही पोलिसांची नजर गेली आहे. सध्या लोहमार्ग पोलीस आरोपींकडे या गांजाच्या खेपेचा स्रोत कुठला होता आणि तो शेवटी कुठे पोहोचवायचा होता, याबाबत चौकशी करत आहेत.