ठाणे गुन्हा: कर्तव्यावर असलेल्या पीएसआयवर हल्ला; डोक्यात वीट घालून हत्या, घटनेने ठाणे हादरलं
ठाणे शहरात कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला आरोपीने रस्त्यावर वीट मारून ठार केलं.
ठाणे शहरात गुरुवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला रस्त्यावर एका आरोपीने वीट मारून ठार केलं. मृत पोलीस अधिकाऱ्याचं नाव किसन भोईर (वय 56) असं असून ते चितळसर पोलीस स्टेशनला कार्यरत होते. या प्रकरणात राजू वाल्मिकी (वय 30) या आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरच पकडलं आहे. या घटनेमुळे ठाणे पोलीस दलात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साधारण 11.15 च्या सुमारास पीएसआय भोईर आपल्या सहकाऱ्यांसोबत पीसीआर व्हॅनमधून पोखरण रोड क्रमांक 2 भागातील सुभाषनगर परिसरात गस्त घालत होते. गस्त घालत असतानाच त्यांना रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या एका पानटपरीवर मोठी गर्दी जमलेली दिसली. ही गर्दी पाहून भोईर यांनी संबंधितांना ती टपरी बंद करण्यास सांगितलं.
याच ठिकाणी आरोपी राजू वाल्मिकी दारूच्या नशेत आरडाओरडा करत होता. पोलिसांनी त्याला शांत राहून तिथून निघून जाण्यास सांगितलं, पण त्याने ऐकण्याऐवजी पोलिसांसोबत वाद घालायला सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये आणि वातावरण निवळावं यासाठी पोलिसांनी त्याला गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी त्याने जोरदार विरोध करत पोलिसांशी धक्काबुक्की केली.
यानंतर आरोपीने भोईर यांना जोरात ढकलून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपी पळत असताना पीएसआय भोईर त्याच्या मागे धावले. नेमकी हीच संधी साधत संतापलेल्या राजू वाल्मिकीने रस्त्यावर पडलेली एक सिमेंटची वीट उचलली आणि ती थेट भोईर यांच्या डोक्यात फेकून मारली. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले भोईर जागच्याजागी रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
घटना कळताच जवळपास असलेले इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपी राजू वाल्मिकीला तिथेच ताब्यात घेतलं. गंभीर जखमी अवस्थेतील पीएसआय भोईर यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं.
या प्रकरणी चितळसर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी राजू वाल्मिकीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गणपती बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर रात्रीचं कर्तव्य बजावत असताना पीएसआय भोईर यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. कर्तव्यावर असताना एका पोलीस अधिकाऱ्याचा अशा प्रकारे बळी गेल्यामुळे पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.