नागपुरात नवविवाहितेला हुंड्यासाठी छळ, तीनदा तलाक बोलून घराबाहेर काढल्याचा आरोप
वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत हुंड्यासाठी छळ झाल्याची तक्रार, पती, दीर आणि सासूविरोधात गुन्हा दाखल
नागपूर शहरातील वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत एका नवविवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. पाच लाख रुपयांची मागणी पूर्ण न झाल्याने आधी मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर तीनदा तलाक बोलून पीडितेला घराबाहेर काढल्याचा आरोप सासरच्या मंडळींवर करण्यात आला आहे.
२१ वर्षीय पीडितेचा विवाह आरोपी आशिक छवारे याच्याशी झाला होता. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या वडिलांनी लग्नाच्या वेळी फ्रीज, कपाट, वॉशिंग मशीन, ड्रेसिंग टेबल असे संसारोपयोगी सामान दिले होते. मात्र लग्न झाल्यानंतर फार काळ लोटला नव्हता, तोच पती आशिक छवारे, दीर मो. तौसीफ आणि सासू शमसुनिसा या तिघांनी मिळून पाच लाख रुपये हुंड्याची मागणी सुरू केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
ही मागणी पूर्ण करता न आल्याने पीडितेला त्रास देण्यास सुरुवात झाल्याचा आरोप आहे. तिला शिवीगाळ करून मारहाण केली जात असे, असेही पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. यासोबतच आशिकने दुसऱ्या एका महिलेशी लग्न करण्याची धमकीही दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
तक्रारीनुसार, २ जुलै २०२६ रोजी आशिकने शिवीगाळ करत तीनदा तलाक असे बोलले. यानंतर पीडितेच्या भावाला घरी बोलावून तिला घराबाहेर काढण्यात आले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण भरोसा सेलकडे पाठवण्यात आले होते. भरोसा सेलने दिलेल्या अहवालाच्या आधारे वाठोडा पोलिसांनी पती आशिक छवारे, दीर मो. तौसीफ आणि सासू शमसुनिसा या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.