तंत्रज्ञान सजीवसृष्टीच्या मदतीसाठी वापरा, सीओईपीतील परिषदेत आनंदराव पाटील यांचे आवाहन
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि आयआयआयटी अलाहाबाद यांच्या पाचव्या सीवीएमआय-२०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांच्या हस्ते झाले.
तरुणांनी मिळालेल्या ज्ञानाचा आणि संशोधनातून घडलेल्या तंत्रज्ञानाचा वापर देशाच्या रचनात्मक उभारणीसाठी करावा, असे आवाहन भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांनी केले. ज्ञान, संशोधन आणि नितीमूल्यांची दीर्घ परंपरा असलेल्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि आयआयआयटीसारख्या अनेक संस्था देशभरात काम करत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि आयआयआयटी, अलाहाबाद म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांनी मिळून ही परिषद भरवली आहे. आयईईई पुणे आणि उत्तर प्रदेशच्या पुणे विभागाच्या विशेष सहकार्याने ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या काळात पाचवी सीवीएमआय-२०२६ आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. तिचे उद्घाटन आनंदराव पाटील यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले की, तंत्रज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. त्यामुळे येत्या वर्षांत तंत्रज्ञानात आणि पर्यायाने आपल्या आयुष्यात नेमके कोणते बदल होतील, हे आज ठामपणे सांगता येणार नाही. तरीही या तंत्रज्ञानाचा वापर न्याय्य पध्दतीने करणे, ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर सजीवसृष्टीच्या मदतीसाठी करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
आयआयआयटीए प्रयागराजच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष प्रा. भीम सिंग यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादनांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्या, तर खऱ्या अर्थाने विकास होईल. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै यांनी तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी फक्त आकर्षक उद्योगजगतात न करता कृषी क्षेत्रासारख्या अगदी मुलभूत क्षेत्रातही करण्यावर भर द्यायला हवा, असे मत मांडले.
ग्वाल्हेर येथील एबीव्ही अर्थात अटल बिहारी वाजपेयी भारतीय सूचना तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन संस्थेचे संचालक प्रा. श्रीनिवास सिंग यांनी तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून राहू नये, तर त्याचा वापर आपला मदतनीस म्हणून करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनिल भिरुड यांनी परिषदेसाठी देशभरातून एक हजार प्रबंध मिळाले, अशी माहिती दिली. त्यातून सुमारे शंभर शोधनिबंधांची निवड करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
उद्घाटनाला पाटील, पै, भीम सिंग, भिरुड आणि श्रीनिवास सिंग यांच्याबरोबरच प्रयागराज येथील आयआयआयटीए म्हणजेच भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थेचे संचालक प्रा. मुकुल एस. सुतावणे उपस्थित होते. सुतावणे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युगा कदम आणि प्रियांका मराठे यांनी केले, तर सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या रील विभागाचे संचालक डॉ. श्रीनिवास पी. महाजन यांनी आभार मानले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.