विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडली, लक्ष्मी रस्त्यावर गतवर्षीपेक्षा 12 डेसिबल आवाज वाढला
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पाहणीत लक्ष्मी रस्त्यावरील दहा चौकांत सरासरी 104.5 डेसिबल आवाजाची नोंद, जनजागृती आणि आंदोलनांनंतरही आवाज कमी न होता वाढलाच.
गणपती विसर्जन मिरवणुकीत यंदाही लक्ष्मी रस्त्यासह पुण्याच्या मध्यवर्ती भागात ध्वनिप्रदूषणाने गंभीर पातळी गाठल्याचे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पाहणी अहवालातून समोर आले आहे. लक्ष्मी रस्त्यावरील दहा प्रमुख चौकांत मिरवणुकीदरम्यान सरासरी 104.5 डेसिबल आवाजाची नोंद झाली. गेल्या वर्षी हाच आकडा 92.6 डेसिबल इतका होता, म्हणजे यंदा तब्बल 12 डेसिबलने आवाज वाढला.
विशेष बाब म्हणजे यंदा पुणे पोलिसांकडून ध्वनिप्रदूषणाविरोधात मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम, आंदोलने आणि बैठका घेण्यात आल्या होत्या. तरीही प्रत्यक्ष मिरवणुकीत आवाजाची पातळी कमी होण्याऐवजी उलट वाढलेली दिसली.
मिरवणुकीआधीपासूनच डीजेचा वापर आणि वाढते ध्वनिप्रदूषण हा विषय चर्चेत होता. पण प्रत्यक्ष मिरवणुकीत ढोल-ताशा पथकं, डीजे, डॉल्बी आणि लाऊडस्पीकरच्या दणदणाटामुळे मध्यवर्ती भाग पुरता दणाणून गेला. सीओईपीच्या उपयोजित विज्ञान आणि मानव्यविद्या विभागाचे प्रमुख महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समन्वयक मेहेर आणि आयुष यांनी मिरवणुकीदरम्यान वेगवेगळ्या वेळी आवाजाच्या पातळीची नोंद घेतली. बेलबाग, गणपती, लिंबराज, कुंटे, उंब्र्या, गोखले, शेडगे, होळकर, टिळक आणि खंडोजीबाबा या चौकांमध्ये हे मोजमाप करण्यात आले.
दुपारी चार ते मध्यरात्री बारा या वेळेत आवाजाची तीव्रता सर्वाधिक वाढलेली दिसली. सगळ्या चौकांची मिळून सरासरी पातळी दुपारी चार वाजता 113.4 डेसिबल, रात्री आठ वाजता 111.9 डेसिबल तर मध्यरात्री बारा वाजता 112.6 डेसिबल इतकी नोंदवली गेली. उंब्र्या चौकात दुपारी चार वाजता 115.2 डेसिबल, तर गोखले चौकात रात्री आठ वाजता 115.4 डेसिबल इतका आवाज नोंदला गेला.
चौकनिहाय सरासरी आवाज पाहिला तर होळकर चौकात 106.8, शेडगे विठोबा चौकात 106.3, टिळक चौकात 105.5, गोखले चौकात 104.4, खंडोजीबाबा चौकात 104.2, उंब्र्या चौकात 104.1, बेलबाग चौकात 104.0, लिंबराज महाराज चौकात 103.5, गणपती चौकात 103.3 आणि कुंटे चौकात 102.8 डेसिबल इतकी नोंद झाली. या दहा चौकांची एकूण सरासरी 104.5 डेसिबल भरली.
गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिली तर 2022 मध्ये 105.2, 2023 मध्ये 101.2, 2024 मध्ये 94.8 आणि 2025 मध्ये 92.6 डेसिबल इतकी नोंद होती. यंदा 2026 मध्ये हा आकडा पुन्हा 104.5 डेसिबलपर्यंत वर गेला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्यावसायिक भागासाठी दिवसा 65 आणि रात्री 55 डेसिबल, तर निवासी भागासाठी दिवसा 55 आणि रात्री 45 डेसिबल इतकी मर्यादा घालून दिली आहे. सीओईपीच्या पाहणीतील 104.5 डेसिबलची सरासरी या मर्यादांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने काय नियोजन केले होते आणि ते प्रत्यक्षात किती प्रभावी ठरले, यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रत्येक चौकात आवाजावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा असणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरच्या आवाजाची जणू चढाओढच सुरू असल्याचे दिसले. शिवाय रस्त्यावरील गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे मिरवणुकीदरम्यान रुग्णवाहिकांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागला. यामुळे ध्वनिप्रदूषणासोबतच मिरवणुकीच्या एकूण नियोजनावरही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले.