सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:21 IST

टायगर श्रॉफवरील गोळीबार: आधी तीन बड्या कलाकारांची रेकी, पिस्तूल रेल्वेने मुंबईत आणले

टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या तपासात पोलिसांना नवी माहिती मिळाली आहे. टायगर हे आरोपींचे सुरुवातीचे लक्ष्य नव्हते, असे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात तिघांना अटक झाली आहे.

टायगर श्रॉफवरील गोळीबार: आधी तीन बड्या कलाकारांची रेकी, पिस्तूल रेल्वेने मुंबईत आणले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या तपासात पोलिसांच्या हाती नवी आणि धक्कादायक माहिती लागली आहे. टायगर श्रॉफ हे आरोपींचे सुरुवातीचे लक्ष्य नव्हते, असे तपासात समोर आले आहे. त्याआधी आरोपींनी अमिताभ बच्चन, आमीर खान आणि अक्षय कुमार या बॉलिवूडमधील तीन बड्या कलाकारांची रेकी केली होती. पण त्यांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदणे शक्य नव्हते, म्हणून आरोपींनी टायगर श्रॉफ यांना लक्ष्य केले, असे पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, या हल्ल्यासाठी वापरलेले पिस्तूल आणि गोळ्या मुंबईत पोहोचवण्यासाठी 'डेड लेटर बॉक्स' या पद्धतीचा वापर झाल्याचे पोलिसांना आढळले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने अमृतसरमध्ये हे शस्त्र ठेवले होते. अनिल पंडित याने त्या शस्त्राचे लोकेशन कुणाल आणि सुमित यांना पाठवले. त्यानंतर सुमारे दोन आठवड्यांपूर्वी कुणाल आणि सुमित अमृतसरला गेले आणि त्यांनी पिस्तूल ताब्यात घेतले. शस्त्र मुंबईत आणण्यासाठी आरोपींनी दोन तरुणींची मदत घेतली. राधा आणि बबिता यांना दिल्लीहून मुंबईला रेल्वेने पाठवण्यात आले आणि पिस्तूल राधाच्या बॅगेत ठेवले होते. अशा प्रकारे पोलिसांच्या नजरेत न येता शस्त्र मुंबईत आणले गेल्याचे तपासात समोर आले आहे.

कुणाल नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. हरसाना गावातील एका मित्रामार्फत त्याची अनिल पंडितशी ओळख झाली. त्यानंतर दोघे एन्क्रिप्टेड ॲपवरून एकमेकांच्या संपर्कात होते. अनिल पंडितच्या सांगण्यावरून कुणालने अमृतसरमधून एक पिस्तूल आणि २० राऊंड घेतले. त्या वेळी सुमितही त्याच्यासोबत अमृतसरला गेला होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी कुणालची राधाशी ओळख झाली होती आणि त्याने तिला आपल्या कारवायांची माहिती दिली होती. त्यानंतर तिला शस्त्र घेऊन मुंबईला जाण्यास तयार करण्यात आले, असा पोलिसांचा संशय आहे.

१५ ऑक्टोबर रोजी कुणाल राधा आणि बबिता यांना घेऊन नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर गेला. पिस्तूल राधाच्या बॅगेत ठेवण्यात आले. रेल्वे प्रवासात कुणाल एन्क्रिप्टेड ॲपवरून अनिल पंडितच्या संपर्कात होता आणि त्याच्या सूचनांनुसार पुढची पावले उचलत होता. शस्त्रांची वाहतूक करण्यासाठी अनिल पंडितकडून सुमारे ७० ते ८० हजार रुपये देण्यात आल्याचेही पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. त्यातले १० ते १२ हजार रुपये राधा आणि बबिताला मिळाले असावेत, असा पोलिसांना संशय आहे.

१८ ऑक्टोबर रोजी एका पार्कबाहेर टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर दोघांनी बेछूट गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यात टायगर बचावले. घटनेनंतर पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. आता पोलीस आरोपींचे नेटवर्क, शस्त्रांचा पुरवठा, हल्ल्याचा कट आणि त्यामागील सूत्रधारांचा शोध घेत आहेत. बॉलिवूडमधील इतर कलाकारांची रेकी का करण्यात आली आणि शेवटी टायगर यांनाच लक्ष्य कसे करण्यात आले, याचाही उलगडा करण्याचा प्रयत्न तपासात सुरू आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ