इतवारी सराफा बाजारात मुनीमकडे सोन्याच्या बिस्किटांसोबत रोख ९० लाखही होते
नागपुरातील इतवारी सराफा बाजारात एका सराफा व्यापाऱ्याच्या मुनीमकडून दोन कोटी रुपयांचे सोन्याचे बिस्कीट जप्त करण्यात आले, त्याचवेळी त्याच्याकडे रोख ९० लाख रुपयेही सापडल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण याच रकमेतून मिटवण्यात आल्याची चर्चा आता सराफा बाजारात आणि पोलीस वर्तुळात जोर धरत आहे. प्राईम टाईम २४ने हे प्रकरण उघडकीस आणल्यापासून पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली असून, सत्य समोर आल्यास कारवाई होईल या भीतीने अनेकांची झोप उडाली आहे.
ही घटना १७ सप्टेंबरच्या रात्री घडली. इतवारी सराफा बाजारातील व्यावसायिक दत्तू यांचा मुनीम त्या दिवशी दुकान बंद केल्यानंतर एका थैलीत दोन किलो सोन्याचे बिस्कीट आणि रोख ९० लाख रुपये घेऊन दुचाकीवरून जवळच्याच लॉकरकडे निघाला होता. मुनीम या ठिकाणी सोने आणि रोख रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी जात असताना, आधीच सापळा रचून बसलेल्या पोलीस पथकाने त्याला अडवून ताब्यात घेतले. यानंतर त्याला तहसील पोलीस स्टेशनला नेण्यात आले.
तहसील पोलीस स्टेशनमध्ये मुनीमला नेल्यानंतर, हे हवालाचे प्रकरण असल्याचा संशय व्यक्त करत केंद्रीय आर्थिक तपास यंत्रणेला बोलावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. सोन्याचे बिस्कीट आणि रोख रक्कम जप्त होण्याचा धोका लक्षात घेऊन दत्तू यांनी तातडीने सराफा बाजारातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या प्रयत्नांनंतर सोने आणि रोख रक्कम मुनीमला परत सोडून देण्यात आली. संपूर्ण प्रकरण अत्यंत गुप्तपणे हाताळले गेल्याने याची कुणालाच कुणकुण लागली नाही, मात्र प्राईम टाईम २४ने हे प्रकरण उघड केल्यानंतर पोलीस खात्यात एकच धावपळ उडाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थैलीत मोठी रोख रक्कम असल्याने पोलीस पथकाला हे प्रकरण मिटवण्यास फारसा वेळ लागला नाही. सराफा बाजारातीलच एका व्यापाऱ्यावर पोलिसांना ही टीप दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. व्यावसायिक स्पर्धेतून त्या व्यापाऱ्याने ही माहिती पोलिसांना दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र याबाबत ठोस पुष्टी झालेली नाही.
या प्रकरणानंतर इतवारीतील हवाला ऑपरेटरही सावध झाले असून, पोलिसांनी त्यांना काही दिवस संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. सणासुदीचा हंगाम असल्याने सध्या हवाला व्यवहारांना वेग आला आहे, अशी माहितीही समोर आली आहे.