मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:30 IST

सिंधुदुर्गातील 900 कोटींच्या जमीन व्यवहारावरून राऊत-राणे यांच्यात आरोप-प्रत्यारोप

सिंधुदुर्गातील कथित जमीन व्यवहारावरून संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले असून आधी चौकशी अहवाल येऊ द्या अशी भूमिका मांडली आहे.

सिंधुदुर्गातील 900 कोटींच्या जमीन व्यवहारावरून राऊत-राणे यांच्यात आरोप-प्रत्यारोप
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

राज्याच्या राजकारणात निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेवरून आधीच वाद सुरू असताना आता सिंधुदुर्गातील एका कथित 900 कोटी रुपयांच्या जमीन व्यवहारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची नवी फैर झडली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोकणातील एका मंत्र्यावर गंभीर आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. राऊत यांनी नाव घेतले नसले तरी ही टीका मंत्री नितेश राणे यांच्यावर असल्याचे बोलले जात आहे.

राऊत यांनी उपस्थित केलेला मुद्दा असा आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग या भागातील सुमारे 900 कोटी रुपयांची शेतजमीन शेतकरी नसलेल्या बंगळुरू, दिल्ली आणि हैदराबादमधील धनिकांना विकण्यात आली आहे. महाराष्ट्रात शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीवर कायदेशीर निर्बंध असताना हे व्यवहार कसे झाले, असा सवाल राऊत यांनी केला. या प्रकरणाची महसूल विभागाकडून चौकशी सुरू असल्याचा दावाही राऊत यांनी केला असून या व्यवहारामागे कोकणातील राजकीय व्यक्तींचा हात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला थेट प्रश्न विचारले. या मुद्द्यासोबत त्यांनी जंगलतोडीचाही विषय उपस्थित केला असून स्थानिक शिवसैनिकांसोबत संबंधित भागाची पाहणी करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

या आरोपांना नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राणे यांनी राऊत यांचे आरोप फेटाळून लावत आधी चौकशीचा अहवाल येऊ द्या, अशी भूमिका मांडली. काहीही चुकीचे झालेले नाही असा दावा त्यांनी केला आणि राजकीय आरोप करण्याऐवजी संबंधित जीआर आणि सरकारी निर्णय समजून घेण्याची गरज असल्याचे सांगितले. राणे म्हणाले, "कोणी चुकीचं केलेलं नाही. आधी अहवाल येऊद्या.. त्या दिवशी संजय राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी कुठेना कुठे शोधावं लागेल."

दरम्यान, या जमीन व्यवहाराची चौकशी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सुरू असल्याचे वृत्त आहे. चौकशीत काही गैरप्रकार आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी भूमिकाही राणे यांनी मांडली. त्यामुळे या प्रकरणात चौकशीचा अहवाल काय सांगतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आपल्या 'X' अकाऊंटवरून यावर भाष्य करताना नितेश राणे म्हणाले, "आज संजय राऊत जी नी सिंधुदुर्ग जमिनी व्यवहारा बदल योग्य मुद्दा घेतला आहे.. बिलकुल मागे बघू नका.. बोलत रहा.. मग बघा कोणाचे वस्त्रहरण होते शेवटी! संजय राजाराम राऊत आगे बढो.. हम तुम्हारे साथ है!" राणे यांच्या या पोस्टमुळे या कथित गैरव्यवहाराबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला असून यातून नेमके काय निष्पन्न होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ