श्वेता महाले यांच्याकडे 10 ते 12 महिलांची तक्रार, गायकवाडांच्या आव्हानावर प्रतिसाद
भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे आव्हान स्वीकारल्याचे सांगितले.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना एक आव्हान दिले होते. शिवसैनिक महिलांना माझ्या घरातून मेसेज जात असल्याचा पुरावा दिला, तर मग माझ्या स्वभावाप्रमाणे मी काय करायचे ते करेन, असे गायकवाड यांनी म्हटले होते. श्वेता महाले यांनी हे आव्हान स्वीकारले आहे.
महाले मीडियाशी बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे 10 ते 12 महिलांनी तक्रार केली आहे. आणखी काही महिलांना तक्रार करायची आहे, पण त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याने त्या पुढे येत नाहीत, असा दावा महाले यांनी केला. नीचपणा कोण करतंय ते दिसतंय, असेही त्या म्हणाल्या. ज्यांनी मेसेज केले, त्यांना आम्ही समज देऊ, त्यांना योग्य पद्धतीने समजून सांगू, पण तुम्ही कुठे जाऊ नका, असे या महिलांना सांगितले जात आहे, असेही महाले यांनी सांगितले. तरीही 10 ते 12 महिलांनी तक्रार केली आहे, असे त्या म्हणाल्या.
महाले यांच्या म्हणण्यानुसार, आम्हाला समाजात राहावे लागते, त्यामुळे फक्त आमचे नाव बाहेर येऊ नये आणि गोपनीयता पाळली पाहिजे, अशी या महिलांची इच्छा आहे. तसा विश्वास आपण त्यांना दिला आहे, असे त्यांनी सांगितले. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवरून या महिलांना मेसेज करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. पुढच्या आठवड्यात डीआयजींना भेटून याची माहिती देणार असल्याचे त्या म्हणाल्या. या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यावर हलकटपणा आणि नीचपणा दिसून येईल, असे महाले यांनी म्हटले.
शिवसेनेच्या महिला आघाडीने महाले यांच्याविरोधात निवेदन दिले आहे, त्याचे काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर महाले यांनी दावा केला की, शिवसेनेच्या महिला आघाडीने त्यांच्या नेत्यांच्या दबावामुळे निवेदन दिले. निवेदन देताना त्या महिला आपल्याशी बोलल्या, असे महाले यांनी सांगितले. निवेदन तुमच्याविरोधात द्यायचे नव्हते, आमच्या नेत्यांनी आईबहिणींवरून शिव्या दिल्या, त्यांच्याविरोधात निवेदन द्यायचे होते, पण नेत्यांचा दबाव असल्याने तुमच्याविरोधात देत आहोत, असे या महिलांनी आपल्याला सांगितले, असा दावा महाले यांनी केला.
चिखलीचा गाझियाबाद झाला, अशी टीका गायकवाड यांनी केली होती. त्यावरही महाले यांनी प्रतिक्रिया दिली. चिखलीचा गाझियाबाद झाला की नाही, हे चिखलीची जनताच सांगेल, असे त्या म्हणाल्या. चिखली सुसंस्कृत आहे, इथे कुणी दारू पिऊन भररस्त्यात कुणाला शिव्या देत नाही, असेही त्यांनी म्हटले. बुलढाण्यात ज्यांचे अवैध धंदे आहेत, ते मोर्चात सहभागी होतात, उलट तेच म्हणतात की अवैध धंदे बंद झाले पाहिजेत, असा हल्ला महाले यांनी केला. महाले यांच्या या इशाऱ्यामुळे गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.