शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? तीन ते चार महिन्यांत मोठ्या घडामोडी घडतील, मंत्री संजय शिरसाट यांचे विधान

शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? तीन ते चार महिन्यांत मोठ्या घडामोडी घडतील, मंत्री संजय शिरसाट यांचे विधान छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिंदे सेनेतील वाद पेटला असतानाच मंत्री संजय शिरसाट यांनी येत्या तीन ते चार महिन्यांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील, असे विधान केले आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नेमके काय शिजते आहे, याचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिंदे सेनेतील वाद चांगलाच पेटला आहे. दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवत असतानाच राज्यात आता नव्या चर्चेला उधाण आले आहे. याच दरम्यान मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील, असे सूचक विधान शिरसाट यांनी केले.

शिवसेना आणि भाजपमध्ये कोणताही वाद नाही, असे स्पष्ट करत शिरसाट यांनी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांना सुनावले. टीका करताना प्रत्येकाने आपली पातळी सांभाळावी, असा इशारा त्यांनी दिला. नवनाथ बन यांच्या वक्तव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मात्र, त्यांच्या पुढच्या विधानाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. येत्या तीन महिन्यांत राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, यासाठी बरीच चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. शिंदे हे कॉमन मॅन आहेत, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला आणखी हवा दिली. एवढेच नाही, तर पुढील वर्ष शिवसेनेचे असेल, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेवरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात, त्यामुळे लगेच नवीन राजकीय समीकरणे तयार झाली, असा अर्थ काढणे योग्य नाही, असे ते म्हणाले. मात्र, राज ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात काही चर्चा झाली आहे का, हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे सूचक विधानही त्यांनी केले.

दुसरीकडे, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत आपली भूमिका मांडली. एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, ही प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे, असे बांगर म्हणाले. मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली, तर मराठवाड्यासह आजूबाजूच्या भागात शिवसेना वाढवण्यासाठी काम करेन, असेही बांगर यांनी सांगितले.

शिरसाट आणि बांगर यांच्या या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. पुढील काही महिन्यांत खरेच काही मोठा राजकीय निर्णय होणार का, की ही केवळ राजकीय विधानबाजी आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ