मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:59 IST

मोहोळमधील शेटफळ गावात दोन गटांत राडा, जवानाच्या डोक्यावर सत्तूरने वार

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावात जुन्या वादातून, धार्मिक प्रथेवरून झालेल्या तंट्यातून आणि शेळ्या शेतात गेल्याच्या कारणावरून दोन गटांत मोठी हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या राड्यात भारतीय सैन्यातील एक जवान आणि दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेनंतर गावात तणाव पसरला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पहिली घटना २३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास राजमाता दूध संकलन केंद्रासमोर घडली, असं तक्रारीत म्हटलं आहे. शेळ्या चरण्यावरून झालेल्या वादानंतर सैन्यातील जवान सुमित उत्तरेश्वर खडके आणि त्यांचे चुलत भाऊ राम वसंत खडके दूध संकलन केंद्रावर गेले होते. त्यावेळी काही जणांनी त्यांना घेरून मारहाण केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार सुमित खडके यांच्या डोक्यावर सत्तूरने वार करण्यात आला, तर राम खडके यांनाही मारहाण झाली. मध्यस्थी करायला आलेल्या लोकांवरही हवेच्या पंपाने हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याच हाणामारीत राम खडके यांच्या खिशातील ११ हजार रुपये आणि सुरज खडके यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावल्याचा आरोप आहे. तक्रार दिल्यास अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत नमूद आहे. राम खडके यांच्या तक्रारीवरून मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑगस्ट महिन्यात श्रावणी सोमवारी सिद्धेश्वर मंदिरातील पादुकांना हार घालण्यावरून वाद झाला होता, हीच त्यामागची पार्श्वभूमी असल्याचं सांगितलं जातं. याच जुन्या वादातून २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास परिस्थिती पुन्हा चिघळली. भीमनगर भागात १०० हून अधिक लोकांचा जमाव जमल्याचा आरोप आहे. पोलीस बंदोबस्त असतानाही जमावाने अरविंद सिद्धेश्वर थोरात यांच्या घरात घुसून लोखंडी पाइप आणि काठ्यांनी मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

अरविंद थोरात यांच्या डोक्यावर लोखंडी पाइपने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. परिसरातील इतर घरांमध्येही तोडफोड आणि मारहाण झाल्याचं सांगण्यात आलं आहे. सीसीटीव्ही कॅमेरेही फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ३६ नावानिशी ओळखलेल्या व्यक्ती आणि १०० हून अधिक अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा प्रयत्न, दंगल आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शेटफळला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रांताधिकारी सचिन इथापे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप, सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे आणि पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. पुढचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. या प्रकरणाचा पुढचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ