उसेगावात शेळीवरून वाद, बैलगाडीच्या उभारीने मारहाण; दोन भावांवर गुन्हा दाखल
सावली तालुक्यातील उसेगाव येथे शेळी घराकडे गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादात ५५ वर्षांचे एक जण गंभीर जखमी झाले असून सावली पोलिसांनी दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रपूर : सावली तालुक्यातील उसेगाव येथे शेळीवरून झालेल्या वादात एक ५५ वर्षांची व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. शेळी शेजाऱ्यांच्या घराकडे गेल्याच्या कारणावरून वाद झाला, असे तक्रारीत म्हटले आहे. जखमीवर सध्या गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सावली पोलिसांनी दोन भावांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उसेगाव येथे राहणारे आणि मजुरी करणारे शालीक डोनुजी घोनमोडे (वय ५५) हे २८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या पाच शेळ्या चारून घरी परतले. नेहमीप्रमाणे ते शेळ्या घरासमोर बांधत होते. तेव्हा घराजवळच राहणारा दिनेश गोविंदा गेडाम (वय ३५) तेथे आला. 'तुझी शेळी नेहमी माझ्या घरी का येते?' असे म्हणत तो शालीक यांना अश्लील शिवीगाळ करू लागला, असे तक्रारीत नमूद आहे.
त्यावर शालीक यांनी, 'मी शेळी बांधत आहे, तू विनाकारण शिव्या का देतोस?' असे विचारले. त्यानंतर दिनेश गेडाम आणि त्याचा भाऊ दीपक गोविंदा गेडाम हे दोघे रस्त्यावर आले आणि त्यांनी शालीक यांना जोरजोरात शिवीगाळ सुरू केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
वाद वाढल्यानंतर दिनेश गेडाम याने रस्त्यावर उभ्या असलेल्या बैलगाडीची लाकडी उभारी काढून शालीक यांच्या डोक्यावर जोरात वार केला, असा तक्रारीत उल्लेख आहे. त्याच वेळी दीपक गेडाम हाही दुसरी उभारी घेऊन मारायला धावला, असेही त्यात म्हटले आहे. या हल्ल्यात शालीक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ते रक्तबंबाळ झाले आणि चक्कर येऊन खाली पडले.
हा प्रकार पाहून शालीक यांची पत्नी आणि मोठा भाऊ तातडीने घटनास्थळी पोहोचले. दीपक गेडाम धमक्या देत असतानाच त्यांनी त्याला कसेबसे अडवले. रक्तबंबाळ अवस्थेतील शालीक यांना त्यांनी लगेच सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार झाल्यावर प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.
रुग्णालयात उपचार सुरू असताना शालीक घोनमोडे यांनी दिलेल्या बयाणावरून सावली पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी गुन्हा नोंदवला. आरोपी दिनेश गोविंदा गेडाम आणि दीपक गोविंदा गेडाम या दोघा भावांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २९६, ३(५), ३५१(२) आणि ११८(१) अन्वये हा गुन्हा आहे. पोलीस निरीक्षक प्रदिप पुल्लारवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरशेन बीके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.