साताऱ्याच्या आशियाई क्रीडा पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली, साहिल, ऋतुजा आणि सुदेष्णाचा सत्कार
जपानमधील नागोया येथे झालेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सातारा जिल्ह्यातील खेळाडूंचा साताऱ्यात गौरव करण्यात आला.
सातारा : जपानमधील नागोया येथे पार पडलेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी ऐतिहासिक आणि अभूतपूर्व यश मिळवले आहे. त्यामुळे साताऱ्याच्या क्रीडा विश्वात अभिमानास्पद कामगिरी झाली आहे. या खेळाडूंचा साताऱ्यात मोठ्या थाटात गौरव करण्यात आला.
या स्पर्धेत साहील जाधव याने आर्चरीमधील कंपाऊंड प्रकारात दोन सुवर्ण पदके मिळवली. ऋतुजा पिसाळ हिने हॉकी खेळात सुवर्ण पदक जिंकले. सुदेष्णा शिवणकर हिने ४x१०० मीटर रिले या मैदानी प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला.
या सर्व गुणवंत खेळाडूंचा, त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांचा तसेच पालकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने भव्य गौरव रॅली आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
खेळाडूंची ही गौरव रॅली गांधी मैदान, राजवाडा ते श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा या मार्गावर अत्यंत उत्साहात काढण्यात आली. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते साहिल जाधव, ऋतुजा पिसाळ आणि सुदेष्णा शिवणकर यांना सन्मानचिन्ह, शाल आणि बुके देऊन गौरवण्यात आले.
या गौरव समारंभाला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, कोल्हापूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील, शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक उपस्थित होते. त्यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, की खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यात किमान एक तरी खेळ खेळला पाहिजे. तसेच खेळाडू आणि मार्गदर्शकांनी अशी यशाची संधी जिल्ह्याला वारंवार उपलब्ध करून द्यावी, असेही ते म्हणाले.
पोलीस अधीक्षक पिंगळे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, की कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए.आय. सर्व काही करू शकते, पण ती खेळातील पदक मिळवून देऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाची आवड जपून त्याचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे.