सातारा जिल्हा बँक: सोसायटी मतदारसंघात ज्ञानदेव रांजणे ३० मतांनी विजयी, गोळे पराभूत
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जावळीतील सोसायटी मतदारसंघात ज्ञानदेव रांजणे यांनी विठ्ठल गोळे यांचा ४७ पैकी ३८ मते मिळवून पराभव केला. गोळे यांना ८ मते मिळाली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जावळीतील सोसायटी मतदारसंघातून ज्ञानदेव रांजणे यांनी मोठा विजय मिळवला. त्यांच्यासमोर विठ्ठल गोळे उभे होते. रांजणे यांनी गोळे यांचा तब्बल ३० मतांनी पराभव केला.
रांजणे यांना या मतदारसंघातील ४७ पैकी ३८ मते मिळाली, तर गोळे यांना फक्त ८ मतांवर समाधान मानावे लागले. निवडणूक जवळपास एकतर्फीच झाली. मालचौडी सोसायटीच्या मतदाराला मात्र नावातील बदलामुळे मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
रांजणे हे बँकेचे संचालक आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांना बँकेसाठी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. संपूर्ण निवडणुकीचे मायक्रो प्लॅनिंग शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आणि त्याच नियोजनामुळे आजच्या निकालात रांजणे यांना ३८ मते मिळाली, असे सांगितले जात आहे.
दुसऱ्या बाजूला विठ्ठल गोळे हे माथाडी कामगार युनियनचे सरचिटणीस असून ते प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे निष्ठावंत मानले जातात. रांजणे यांच्याविरुद्ध खुद्द शिंदे रिंगणात उतरतील, अशी दाट शक्यता होती. पण शिंदे यांनी ऐनवेळी आपल्या या समर्थकाला उमेदवारी दिली. गोळे यांनीही नेत्याचा आदेश मानून केवळ निष्ठेपोटी निवडणुकीत उडी घेतली.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत कुसुंबी गटातून रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर अनेकांनी या गटात आपली राजकीय ताकद जास्त असल्याचा दावा केला. मात्र ती केवळ सूज असल्याचे आता समोर आले आहे. गणपती उत्सवात आरतीला हजेरी लावून नेते म्हणून मिरवणाऱ्यांना सोसायटीचा साधा एक ठरावही घेता आला नाही, असेही म्हटले जात आहे.
निकाल लागताच रांजणे यांच्या समर्थकांनी जावळी तालुक्यात गुलाल उधळला, फटाक्यांची आतषबाजी केली आणि जल्लोष साजरा केला.
या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांची गैरहजेरी जावळीत चर्चेचा विषय ठरली आहे. आपल्या समर्थकाला रिंगणात उतरवल्यानंतर शिंदे मतदानाच्या दिवशी उपस्थित राहून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवतील, अशी अपेक्षा त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांना होती. पण ते मतदानासाठी आले नाहीत आणि त्यांनी मतदानाचा हक्कही बजावला नसल्याचे सांगितले जात आहे. आपला निष्ठावंत समर्थक मैदानात असताना नेत्याची प्रत्यक्ष उपस्थिती कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची असते, त्यामुळे जावळीतील राजकीय वर्तुळात यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
रांजणे यांच्या विजयात त्यांच्या तीन तरुण कार्यकर्त्यांचाही वाटा असल्याचे सांगितले जाते. सोसायटीचे ठराव घेण्यापासून मतदारांना मतदान प्रक्रियेपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी सागर धनावडे, जयदीप शिंदे आणि समीर अत्तार यांच्यावर सोपवण्यात आली होती. मतदारांना सहलीवर पाठवल्यावरून विरोधक एकीकडे आवाज उठवत होते. मात्र हा निवडणूक प्रक्रियेचाच एक भाग होता, असे सांगण्यात येते. तब्बल अडीच महिने सहलीवर नेलेल्या मतदारांची कुटुंबाप्रमाणे काळजी या तिघांनी प्रामाणिकपणे घेतली. त्यामुळे रांजणे यांचा विजयाचा मार्ग आणखी सोपा झाला.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.