गुन्हे दाखल केले तरी तरुणाई मागे हटणार नाही, भाजपने प्रश्नांना उत्तर द्यावे: सपकाळ
शिवाजी पार्कवरील आंदोलनातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारला इशारा दिला आहे.
मुंबई : शिवाजी पार्कवरील आंदोलनातील तरुणांवर सरकारने खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. कितीही गुन्हे दाखल केले तरी ही तरुणाई आता मागे हटणार नाही, हे भाजपा सरकारने लक्षात ठेवावे, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला.
सपकाळ यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र आणि राज्यातील भाजपाचे सरकार भ्रष्ट आहे आणि निवडणूक आयोगाचा कारभार पक्षपाती आहे. याविरोधात तरुणांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शिवाजी पार्कवरील आंदोलनातून त्या असंतोषाला वाचा फुटली, पण मोदी सरकारविरोधातला हा असंतोष दडपण्यासाठीच गुन्हे दाखल झाले, असे ते म्हणाले.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. ते वाचवण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांनी मांडलेले प्रश्न देशासमोरचे ज्वलंत प्रश्न आहेत. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी आरोप केले असताना ज्ञानेशकुमार त्यावर का बोलत नाहीत, यावर भाजपाने बोलावे, असे ते म्हणाले. मूळ मुद्द्याला बगल देऊन नेहमीचेच हिंदु-मुस्लीम आणि भारत-पाकिस्तानचे तुणतुणे वाजवणे बंद करा, असेही त्यांनी सांगितले. सरकारने दडपशाहीने आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तर त्याची मोठी किंमत भाजपा सरकारलाच मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
सपकाळ यांनी आणखी दोन आंदोलनांचा उल्लेख केला. नाशिकपासून मुंबईकडे आदिवासी विद्यार्थ्यांचा लॉंग मार्च निघाला आहे, तर पुण्यात MPSC विरोधात लाखो तरुण विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. शिवाजी पार्कचे आंदोलन धरून या तिन्ही घटना भाजपा सरकारच्या गलथान कारभाराचे वाभोडे काढणाऱ्या आहेत, असे ते म्हणाले. MPSC च्या अध्यक्षांची हकालपट्टी करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तरीही मुख्यमंत्री हात झटकत आहेत, कारण अध्यक्ष भिमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक आहेत, असे सपकाळ म्हणाले. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यासारखे वागावे आणि तो मी नव्हेच असा पवित्रा घेऊ नये, असेही ते म्हणाले.
राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना सपकाळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ नोव्हेंबरला बारामतीच्या दौऱ्यावर येत आहेत, असे समजते. राज्यात मोठा दुष्काळ पडला आहे आणि शेतकरी हवालदिल झाला आहे. मोदी महाराष्ट्रात येताना शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज घेऊन येतील आणि हेक्टरी १ लाख रुपये मदत देतील, अशी अपेक्षा करूया, असे सपकाळ म्हणाले.
विधान परिषदेच्या निवडणुकीवरून मविआत कोणतीही नाराजी नाही, असे सपकाळ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ५ जागांपैकी २ ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत आणि पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. अमरावतीत पक्षाने उमेदवार जाहीर केला आहे, तर इतर दोन जागांवर चर्चा सुरू आहे. ही निवडणूक पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची आहे. आम्ही एकच आहोत, आमच्या भूमिका परस्पर पूरक असतील आणि कोणताही तिढा नाही, असे ते म्हणाले. समन्वय व्यापक करण्यासाठी बैठक होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
जातीय छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या IIT बॅाम्बेच्या विद्यार्थ्याच्या, साहिल वाकोडे याच्या कुटुंबीयांनी शांता आश्रम येथे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, रेहाना चिश्ती, यु.बी. व्यंकटेश, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन आणि प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के उपस्थित होते.