कणकवलीतील जुन्या खुनांचा उल्लेख करत संजय राऊतांचा राणे कुटुंबावर गंभीर आरोप
आदित्य ठाकरेंवरील आरोपांना उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी कणकवलीतील जुन्या खुनांचा पाढा वाचला आणि राणे कुटुंबावर थेट निशाणा साधला.
दिशा सालियन प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. या आरोपांना उत्तर देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत आक्रमक पवित्रा घेतला आणि राणे कुटुंबावर थेट निशाणा साधला.
राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्याबाबत मीडियात जे काही सुरू आहे तो लोकांच्या प्रसिद्धीचा विषय बनला आहे. चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना अब्रू आहे, मग आम्हाला नाही का, असा सवाल त्यांनी केला. कुणाच्या तरी हातचं बाहुलं बनून आदित्य ठाकरेंवर चिखलफेक केली जात आहे आणि संयमाचा बांध फुटला तर आपण बोलू, असा इशाराही त्यांनी दिला.
यानंतर राऊत यांनी कणकवलीत गेल्या २० वर्षांत झालेल्या खुनांचा उल्लेख केला. या काळात गोवेकर, अंकुश राणे, सत्यविजय भिसे, नाईक अशा अनेकांचे खून झाल्याचे त्यांनी सांगितले. यांच्या हाताला रक्त लागलं आहे, जिभेला रक्त लागलं आहे, म्हणून त्यांना सत्तेची गरज आहे. खून पचवण्यासाठी आणि खून दाबण्यासाठी सत्ता हवी आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.
नाईकांचा खून कोणी केला, सत्यविजय भिसेला कोणी मारलं, अंकुश राणेचा खरा मारेकरी कोण, गोवेकरला किडनॅप करून कोणी मारलं, असे थेट सवाल राऊत यांनी उपस्थित केले. या सगळ्या प्रकरणांचा निष्पक्षपणे तपास झाला असता तर आज हे लोक उरलेच नसते, असा दावा त्यांनी केला. या प्रकरणांची दडपणूक करून सीबीआय, महाराष्ट्र पोलीस आणि तपास यंत्रणा विकत घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. हायकोर्टाने या क्षणी कोणीही आरोपी नाही आणि कोणालाही टार्गेट करता येणार नाही, असं स्पष्ट सांगितलं असतानाही हा खेळ सुरू करण्यात आल्याचंही ते म्हणाले.
कुणाच्या तरी हातचं बाहुलं बनून ठाकरेंवर अशा प्रकारे चिखलफेक करणं हा आमच्या प्रतिष्ठेचा आणि अब्रूचा प्रश्न नाही का, असा सवालही राऊत यांनी केला. हा काही बेवड्यांचा आणि उरबडव्यांचा प्रश्न आहे, ते एकत्र आले असून त्यांना कोणीतरी कंट्रोल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दिशा सालियन या तरुणीचा दुर्दैवी अंत झाला, पण जिला कधी पाहिलंही नाही, कधी भेट झाली नाही, कोणताही संबंध नाही, अशा व्यक्तीच्या मृत्यूवरून आदित्य ठाकरेंवर चिखलफेक केली जात असल्याचं ते म्हणाले. या प्रकरणात कोणालाही लक्ष्य करता येणार नाही, हे स्पष्ट झालं असतानाही ही मंडळी अर्थपुरवठा घेऊन ठाकरेंना बदनाम करण्याचं कारस्थान करत असल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.