आइन सेफ्रात तापमान -3 अंशांवर, सोनेरी वाळूवर बर्फाची चादर
अल्जेरियातील आइन सेफ्रा या सहारा वाळवंटातल्या शहरात दुर्मिळ बर्फवृष्टी झाली, त्यामागचं वैज्ञानिक कारण समजून घ्या.
जगातल्या सर्वात उष्ण आणि रखरखीत वाळवंटांपैकी एक असणाऱ्या सहारा वाळवंटात बर्फ पडलं, असं कुणाला सांगितलं तर पहिल्यांदा विश्वासच बसणार नाही. उन्हाळ्यात इथलं तापमान ५० अंश सेल्सिअसच्या पुढे जातं. अशा ठिकाणी लाल-सोनेरी वाळूच्या टेकड्यांवर पांढऱ्या बर्फाची चादर पसरली, तर ते दृश्य पाहणाऱ्याला थक्क करणारं ठरतं. अल्जेरियातल्या आइन सेफ्रा या शहरात नेमकी हीच घटना घडली आहे. या शहराला सहाराचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. इतक्या उष्ण आणि वाळवंटी भागात बर्फ पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या जगभर चर्चेत आहेत.
आइन सेफ्रा शहरात अशी बर्फवृष्टी होण्याची पहिली अधिकृत नोंद १९७९ मध्ये झाली होती. त्यानंतर २०१६, २०१७, २०१८, २०२१, २०२२ आणि अगदी अलिकडेही या भागात बर्फ पडल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. म्हणजे ही घटना खूपच असामान्य असली, तरी ती अशक्य मात्र नाही. वाळवंटात तीव्र उष्णता आणि कोरडं वातावरण असूनही, विशिष्ट हवामान परिस्थिती तयार झाली तर तिथेही बर्फ पडू शकतो, हे या घटनांवरून स्पष्ट झालं आहे.
या उष्ण वाळवंटात बर्फ पडण्यामागे नेमकं काय घडतं? हिवाळ्याच्या दिवसांत युरोपकडून येणारी अत्यंत थंड आणि तीव्र हवा दक्षिणेकडे उत्तर आफ्रिकेच्या दिशेने ढकलली जाते. ही थंड हवा जेव्हा अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्रावरून येणाऱ्या दमट हवेला भेटते, तेव्हा बर्फवृष्टीसाठी लागणारी पहिली अट पूर्ण होते.
वाळवंटातल्या हवेत ढगांचं प्रमाण फार कमी असतं. त्यामुळे दिवसा जमीन जितक्या वेगाने सूर्याची उष्णता शोषून घेते, रात्री तितक्याच वेगाने ती उष्णता आकाशात निघून जाते. यामुळेच हिवाळ्यातल्या रात्री सहारातलं तापमान झरझर घसरतं. आइन सेफ्रामध्ये बर्फ पडलं तेव्हा रात्रीचं तापमान गोठणबिंदूच्या खाली जाऊन -२ अंश सेल्सिअस ते -३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. तापमान शून्याखाली गेलं आणि हवेत आर्द्रता असली, की पाण्याचे थेंब गोठून बर्फाच्या स्फटिकांत बदलतात आणि जमिनीवर बर्फाच्या स्वरूपात पडतात.
आइन सेफ्रामध्येच ही घटना घडण्यामागे तिथली भौगोलिक रचनाही महत्त्वाची आहे. हे शहर समुद्रसपाटीपासून जवळपास १,००० मीटर (३,००० फूट) उंचीवर आहे आणि त्याच्या आजूबाजूला अॅटलास पर्वतरांगा आहेत. महासागरावरून येणारी दमट हवा या उंच पर्वतांना धडकली, की ती वरच्या दिशेने ढकलली जाते. हवा जितकी वर जाते तितकी ती अधिक थंड होते, आणि त्यामुळे हवेतल्या बाष्पाचं बर्फात रूपांतर होणं सोपं होतं.
मात्र वाळवंटात पडलेला हा बर्फ फार काळ टिकत नाही. सूर्योदयानंतर वाळवंटातल्या कडक उन्हामुळे आणि जमिनीच्या तापमानामुळे बर्फ काही तासांतच वितळायला लागतो. हिवाळ्यातली अतिथंड रात्र आणि दिवसाचं उबदार वातावरण, या दोन्ही वाळवंटी वैशिष्ट्यांमुळे बर्फ टिकत नसला, तरी त्या थोड्या वेळात निसर्गाची एक अप्रतिम किमया पाहायला मिळते.
वैज्ञानिकांच्या मते, एका बर्फवृष्टीच्या घटनेला थेट हवामान बदलाचा पुरावा मानणं योग्य ठरणार नाही. तरीही जागतिक तापमानवाढीमुळे जेट स्ट्रीमच्या प्रवाहात होणाऱ्या बदलांचा अशा असामान्य हवामान घटनांवर काही प्रमाणात प्रभाव पडत असावा, यावर शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत.